एका मुलासह दोघांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’, दोन दिवसांत एकाच वाडय़ावरील 70 पेक्षा अधिक नागरिकांची चाचणी, आजपासून रविवारपर्यंत पालिका क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ बंद, स्वेच्छेने ‘लॉकडाऊन’ पाळण्याचा निर्णय
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यातील ज्या वाडय़ावर कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता त्या व्यक्तीच्या कुटुंबातील 21 जणांची 9 रोजी चाचणी करण्यात आली होती. त्यातील एका 8 वर्षांच्या मुलासह दोघांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह ठरलेल्या व्यक्तीप्रमाणे या दोघांनाही शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, संशयावरून सदर वाडय़ावरील 50 पेक्षा अधिक नागरिकांची 10 रोजी काणकोणच्या आरोग्य केंद्रात चाचणी करण्यात आली.
या प्रकाराने भयभीत झालेल्या काणकोणच्या जागरूक नागरिकांनी 10 रोजी सकाळी काणकोण नगरपालिकेजवळ तातडीची बैठक घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून काणकोण पालिका क्षेत्रातील संपूर्ण बाजारपेठ आज गुरुवार 11 पासून रविवार 14 पर्यंत बंद ठेवण्याची तयारी चालविली आहे. चावडीवरील दुकानांसमोर, मासळी मार्केट आणि भाजी मार्केटात सध्या नागरिकांची जी गर्दी उसळत आहे ती धोक्याची घंटा असून व्यापाऱयांनी स्वेच्छेने आपली आस्थापने रविवारपर्यंत बंद ठेवावीत, अशी विनंती करत रमाकांत ना. गावकर, शांताजी गावकर, दिलीप केंकरे, दिनेश पै, वल्लभ पै, दिवाकर भगत, शंकर नाईक, संजय कोमरपंत, बबेश बोरकर, दीपक ना. गावकर, जॅक फर्नांडिस, रमेश देसाई, विकास प्रभू आणि अन्य मंडळी व्यापाऱयांशी संपर्क साधत आहेत. स्वेच्छा लॉकडाऊनच्या कालावधीत काणकोण तालुक्यातील बसवाहतूक त्याचप्रमाणे अन्य वाहतूक चालू असेल, असे जागरूक नागरिकांनी कळविले आहे.
उपजिल्हाधिकारी, मामलेदारांना निवेदन
काणकोणचे प्रमुख व्यापारी केंद्र असलेले बागायतदार भवन देखील या कालावधीत बंद ठेवण्यात यावे. ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते ती पाळोळे, पैंगीण, माशे येथील त्याचबरोबर ग्रामीण भागांतील आस्थापने, येथील सहकारी पतसंस्था देखील बंद ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे एक निवेदन या नागरिकांच्या शिष्टमंडळाने काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू आणि मामलेदार विमोद दलाल यांना सादर केले आहे. मात्र नागरिकांनी अफवांवर विसंबून राहू नये, असा सल्ला उपजिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. प्रशासन आपल्या परीने काम करत असून नागरिकांचे सहकार्य खूपच महत्त्वाचे असल्याचे प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.