गोव्यात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी माजाळी केंद्रातून परीक्षा देण्याची पहिलीच खेप, काणकोण केंद्रात 3 खासगी विद्यार्थी अनुपस्थित
प्रतिनिधी / काणकोण
गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा कसलाच अडथळा न येता शनिवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. काणकोण तालुक्यात पैंगीण आणि काणकोण अशा दोन केंद्रांतून ही परीक्षा घेण्यात येत आहे. काणकोण केंद्रात कात्यायणी बाणेश्वर विद्यालय, सेंट तेरेझा विद्यालय आणि शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय अशी मिळून तीन उपकेंद्रे तयार करण्यात आली आहेत. या तिन्ही उपकेंद्रांत मिळून एकूण 405 विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. त्यातील एकूण 10 खासगी विद्यार्थ्यांपैकी 3 परीक्षेला बसले नाहीत. ते वगळता बाकीचे सारे विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती काणकोण केंद्राच्या प्रमुख गौतमी भगत यांनी दिली.
या ठिकाणी कात्यायणी बाणेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक उदय ना. गावकर, सेंट तेरेझा विद्यालयात शिक्षक पेड्रेको नोरोन्हा आणि शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात अश्वेका कोठूरकर यांच्याकडे उपकेंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पैंगीण केंद्रातून परीक्षेला बसलेल्या एकूण 168 विद्यार्थ्यांपैकी माजाळी येथून लोलये आणि माशेच्या शाळांमध्ये येऊन शिकणाऱया 22 विद्यार्थ्यांची सोय माजाळी येथील युनियन हायस्कूलमध्ये करण्यात आली आहे. खोतीगाव शासकीय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपती नाईक यांच्याकडे सदर केंद्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माजाळी केंद्रातून प्रथमच परीक्षा
माजाळी केंद्रावर ज्या विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे त्यात केपे केंद्रातील एक विद्यार्थी असून सदर विद्यार्थी वगळता पैंगीण केंद्रातील सर्व विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. माजाळी केंद्रातील विद्यार्थी वगळता बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयात करण्यात आली आहे. त्यात 12 विद्यार्थी सीडब्ल्यूएसएन विषय घेऊन बसल्याची माहिती केंद्र प्रमुख सीमा प्रभुगावकर यांनी दिली. आतापर्यंतच्या गोवा बोर्डाच्या इतिहासात गोव्यात शिकणारे विद्यार्थी पहिल्यांदाच कर्नाटकातील माजाळी पेंद्रातून परीक्षेला बसले आहेत. माजाळी येथील युनियन हायस्कूलने गोवा बोर्डाच्या सूचनेनुसार कोविड-19 चा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून व्यवस्थित सोय केलेली आहे.
आवश्यक खबरदारीकडे लक्ष
पैंगीण व काणकोण केंद्रातील सर्व उपकेंद्रांपासून 200 मीटर अंतरावर स्कूल बसेसद्वारे परीक्षार्थींना आणून सोडण्याचे काम शाळा प्रमुख करताना दिसून आले, तर काही ठिकाणी पालक स्वतः आपल्या पाल्यांना घेऊन आले होते. दोन्ही केंद्रांत सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांची उपकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल गनने तपासणी करण्यात आली. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याच्या अगोदर सर्वांसाठी सेनिटायजर वापरून हात निर्जंतुक करण्याची सोय करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर परीक्षार्थींसाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली होती आणि त्यासाठी केंदाने नियुक्त केलेले स्वयंसेवक आणि शिक्षक कर्मचारी राबताना दिसत होते.
परीक्षा केंदांवर कसलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व केंद्रांवर पोलीस कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली होती. माजाळी केंद्रातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका पोळे चेकनाक्यापर्यंत जाऊन माजाळी केंद्राच्या प्रमुखाकडे सोपविण्यात आल्या आणि परीक्षा संपल्यानंतर त्याच ठिकाणी उत्तरपत्रिका गोळा करण्यात आल्या. काणकोण केंद्रातील तिन्ही उपकेंद्रे आणि पैंगीणच्या केंद्रावर मंडळाने नियुक्त केलेले निरीक्षक हेमंत कामत लक्ष ठेवून आहेत. परीक्षेचा पहिला दिवस कसलेच अडथळे न येता सुरळीतपणे पार पडल्याबद्दल निरीक्षक कामत, केंद्र प्रमुख प्रभुगावकर आणि भगत यांनी समाधान व्यक्त केले आहे.