नगराध्यक्ष पदासाठी सायमन रिबेलोव धीरज गावक रयांच्यात चढाओढ,दोन्हीगट भाजपाचेच असल्याचा दावा
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्षपदासाठी सध्या रस्सीखेच चालू असून 31 रोजी अखेरच्या क्षणी मास्तीमळ वॉर्डातील नगरसेवक धीरज ना. गावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी, तर देळे वॉर्डातून निवडून आलेल्या सुप्रिया देसाई यांनी उपनगराध्यक्षपदासाठी पालिकेचे मुख्याधिकारी उदय प्रभुदेसाई यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, ज्येष्ठ नागरिक शांताजी गावकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. धीरज गावकर यांना नगर्से वॉर्डातून निवडून आलेले हेमंत गावकर, तर सुप्रिया देसाई यांना पाटणे वॉर्डातून निवडून आलेले शुभम कोमरपंत यांनी अनुमोदन दिले आहे.
त्यापूर्वी 30 रोजी धीरज गावकर, सुप्रिया देसाई, नीतू देसाई, हेमंत गावकर आणि शुभम कोमरपंत या पाचही नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड यांची पणजी येथे भेट घेतली आणि काणकोण नगरपालिकेतील सर्व घडामोडींची माहिती दिली. यावेळी काणकोण भाजप मंडळाचे प्रमुख नंदीप भगत, माजी नगराध्यक्ष समीर देसाई, शांताजी गावकर आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री तसेच पक्षाध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार आपण नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती धीरज गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काणकोण पालिका मंडळ हे भाजपाचे आणि अमदार फर्नांडिस पुरस्कृतच असेल असा दावा त्यांनी केला.
22 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 12 ही नवनिर्वाचित सदस्यांनी मुख्यमंत्री सावंत तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची भेट घेऊन काणकोण पालिकेचे मंडळ हे भाजपप्रणित असेल असे जाहीर केले होते. त्यापूर्वी स्वतः उपसभापतींनी देखील काणकोण पालिकेचे 12 ही सदस्य भाजपप्रणित असल्याचे जाहीर करून टाकले होते. मात्र अन्य पालिकांप्रमाणे काणकोण पालिका निवडणुकीत अमूकच उमेदवार भाजपाचे असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले नव्हते हे मुख्यमंत्री तसेच पक्षाध्यक्षांच्या नजरेस काही जणांनी आणून दिले आणि त्यामुळेच हा गोंधळ निर्माण झाला असल्याचे स्पष्ट केले.
7 जणांचा गट अज्ञात स्थळी रवाना
त्यापूर्वी एका घडामोडीत माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली रमाकांत गावकर, अमिता पागी, गंधेश मडगावकर, लक्ष्मण पागी, सारा देसाई आणि नारसिस्को फर्नांडिस या 7 जणांनी स्वतंत्र गट तयार करून 5 वर्षांसाठी नगराध्यक्षपद वाटून घेण्याचा प्रकार घडला होता. त्यांनी श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाची भेट घेऊन शपथाही घेतल्या होत्या. त्याचबरोबर या 7 जणांनी नगर्से वॉर्डाचे हेमंत गावकर यांना बरोबर घेऊन उपसभापती फर्नांडिस यांची त्याचदिवशी भेट घेतली होती. त्यानंतर 30 रोजी रिबेलो आणि अमिता पागी यांनी अनुक्रमे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. हे सातही जण सध्या अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. हा गट देखील भाजपाचा असून निवड झाल्यानंतर आपण आपल्या समर्थक नगरसेवकांसहित मुख्यमंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तानावडे आणि अन्य पदाधिकाऱयांची भेट घेणार असल्याचे रिबेलो यांनी जाहीर करून टाकले आहे. या सर्व घडामोडीत माजी मंत्री रमेश तवडकर यांचा हात असून या गटाला त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आज 1 रोजी होणाऱया मतदानाच्या वेळी नेमके काय घडेल याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या रिबेलो यांनी आपला तसेच आपल्या समर्थकांचा उपसभापती फर्नांडिस यांनाच पाठिंबा असल्याचे जाहीर करून टाकले आहे. तर काँग्रेसचे महादेव देसाई हा गट सर्वपक्षीय गट असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आज नेमकी कोणाच्या गळय़ात नगराध्यक्षपदाची माळ पडते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.