काँग्रेस, आम आदमी पक्ष, रिव्हॉल्युशनरी गोवा, गोवा फॉरवर्डकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर
प्रतिनिधी /काणकोण
विधानसभा निवडणुका फेब्रुवारी, 2022 मध्ये होणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर काणकोण मतदारसंघात अनेक पक्षांनी विविध मार्गांनी मतदारांपर्यंत जाण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. सध्या कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूचा लाभ उठवत आम आदमी पक्षाने या मतदारसंघातील नागरिकांना मोफत धान्यवाटप सुरू केले आहे. आरजी संघटनेने सार्वजनिक आणि मोक्याच्या स्थळी निर्जंतुकीकरण करतानाच गरजू लोकांना धान्यवाटपात झोकून दिले आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वीच ऑनलाईन शिक्षणाचा लाभ उठवत कित्येक गरजू मुलांना मोबाईल दिलेले आहेत. काँग्रेस पक्षाने पोलीस, आरोग्य केंद्र, पोळे चेकनाका त्याचप्रमाणे अग्निशामक दलाला पाण्याच्या बाटल्या, ज्या ठिकाणी लसीकरण चालू आहे त्या ठिकाणी अल्पोपहार पुरविण्याच्या कामात झोकून दिले आहे. त्याही पुढे जाऊन जनसेनेच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱयांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा पुरविली आहे.
काँग्रेस पक्ष
सध्या या मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी जिल्हा पंचायत सदस्य दया पागी, काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, काणकोणचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे राज्य सचिव महादेव देसाई यांच्या नावांची चर्चा चालू आहे. भंडारी यांनी यापूर्वी पैंगीणचे सरपंचपद भूषविलेले आहे. मांडवी परिवार, जनसेना अशा विविध माध्यमांतून 24 तास लोकांसाठी उपलब्ध असलेली त्याचबरोबर अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून येणारी व्यक्ती म्हणून काणकोण मतदारसंघातील युवावर्ग त्यांच्याकडे पाहत आहे. त्याचबरोबर देसाई आणि पागी यांचे देखील या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांकडे अगदी जवळचे संबंध आहेत.
आम आदमी पक्ष
2017 च्या विधानसभा निवडणुकीत अगदी नवखा असलेला आम आदमी पक्ष आज काणकोण मतदारसंघात तरी सर्वपरिचित असा पक्ष झालेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार राहिलेले संदेश तेलेकर त्याचप्रमाणे मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील खोल मतदारसंघाचे उमेदवार रॅमी बोर्जिस यांनी बऱयापैकी या ठिकाणी मोर्चेबांधणी केली आहे त्याचप्रमाणे मतदारांच्या गरजा कोणत्या आहेत याचे गणित त्यांनी अनुभवले आहे. ज्या ज्या वेळी काणकोण मतदारसंघावर अन्याय झाला त्यावेळी त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात गरजू व्यक्तींना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू पुरविण्याच्या कामात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोकून दिले आहे. सध्या तरी या पक्षाचे या मतदारसंघात सकारात्मक कार्य चालू असलेले दिसत आहे.
रिव्हॉल्युशनरी गोवा
मूळ गोमंतकीयांचे वर्चस्व आणि स्वत्व हे विषय घेऊन पुढे आलेली आणि आगमनात वादग्रस्त ठरलेली आरजी संघटना देखील काणकोण मतदारसंघात हळूहळू जम बसवायला लागली आहे. या संघटनेचे कार्यकर्ते गुपचूप काम करत असले, तरी पोळे चेकनाका, काणकोण बसस्थानक, चावडी बाजार, सामाजिक आरोग्य केंद्र, पोलीस स्थानक, अग्निशामक केंद्र आणि अन्य मोक्याच्या भागांचे निर्जंतुकीकरण करतानाच गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून ही संघटना लोकाभिमुख झालेली आहे. ते देखील येणाऱया विधानसभा निवडणुकीत उतरणार असून या संघटनेचे काम शिस्तबद्धरीत्या चालू असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. सध्या तरी प्रशांत पागी आणि संगम नाईक या दोन इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.
गोवा फॉरवर्ड
भाजप, काँग्रेस या दोन राजकीय पक्षांबरोबर स्थानिक पक्ष म्हणून गोवा फॉरवर्ड या पक्षाचे नाव घेण्यात येत असून या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असलेले दिलीप प्रभुदेसाई, मोहनदास लोलयेकर, प्रशांत नाईक या तिन्ही व्यक्ती काणकोणच्या आहेत. त्यांचा विद्यार्थी चळवळ, सामाजिक चळवळ, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र, राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असून काणकोणातील सर्वसामान्य मतदारांना परिचित अशा या व्यक्ती आहेत. लोलयेकर यांनी लोलये-पोळे रुग्णवाहिका संघटनेत कार्य केलेले आहे तसेच लोलये-पोळे पंचायतीचे सरपंचपद भूषवलेले आहे. नाईक यांनी मडगावची गाडेमालक संघटना, लोलये पंचायतीचे पंच, निराकार शिक्षण् संस्थेचे अध्यक्ष, मडगावचे रवींद्र भवन, कोकणी भाषा मंडळ, गोवा युवा महोत्सव अशा विविध माध्यमांतून महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आतापर्यंत काणकोण तालुक्यात जी जी आंदोलने झाली त्या प्रत्येक आंदोलनात लोलयेकर, नाईक सहभागी झालेले आहेत. येणाऱया विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील युवकांचा आवाज घेऊन पुढे जायचे आहे आणि त्यादृष्टीने आपले शिस्तबद्धरीत्या काम चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी काणकोण मतदारसंघाला बदल हवा असून माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत आणि विद्यमान आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्या बाबतीत नाराजी मोठी असल्याचा दावा विरोधी गटांकडून केला जात आहे. निवडणुकीला साधारणपणे पाच ते सहा महिने आहेत. या काळात काहीही घडू शकते. तरी देखील प्रमुख राजकीय पक्षांना शह देण्यासारख्या घटना या मतदारसंघात आतापासूनच घडायला लागल्या आहेत.