जनतेच्या पैशांचा अपव्यय : लोलयेचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांचा आरोप
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यातील पोळे ते गुळेपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण म्हणजे आवळा दाखवून कोहळा काढण्याचा प्रकार असून जनतेच्या पैशांची कशा पद्धतीने वाट लावली जाते त्याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया लोलये-पोळेचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी व्यक्त केली आहे.
मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ात स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत फार मोठा गाजावाजा करून या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ केला होता. अंदाजे 13 कोटी रु. इतका खर्च करतानाच मे महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे पावसाळय़ापूर्वी या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले होते. प्रत्यक्षात शुभारंभानंतर दीड महिन्याने कामाला प्रारंभ करण्यात आला आणि हॉटमिक्स डांबरीकरण चक्क पावसात करण्यात आल्याचा आरोप लोलयेकर यांनी केला आहे. यासंबंधी खात्याच्या अभियंत्यांना जाब विचारला असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. शिवाय हॉटमिक्स डांबरीकरण हा नुसता देखावा असून जनतेच्या पैशांचा कशा प्रकारे चुराडा केला जातो याचा हा उत्तम असा दाखला असल्याचा दावा लोलयेकर यांनी केला आहे.
ऑक्ट्रॉय अडविल्याने विकासकामांवर परिणाम
दरम्यान, एकेकाळी काणकोण तालुक्यातील सधन पंचायत असलेल्या लोलये-पोळे पंचायतीचा ऑक्ट्रॉय विद्यमान सरकारने अडवून ठेवला आहे. या पंचायतीमध्ये पोळे येथे दोन, तर माशे येथे एक पेट्रोल पंप असून त्यांच्या माध्यमातून काही लाख रुपये ऑक्ट्रॉयच्या स्वरूपात पंचायतीला मिळायचे आणि त्या उत्पन्नावरच ही पंचायत आपल्या क्षेत्रात विकासकामे करत आलेली आहे. हा अडवून ठेवलेला ऑक्ट्रॉय पंचायतीला देण्यात यावा यासंबंधीची किमान चार तरी निवेदने मुख्यमंत्री ज्या ज्या वेळी काणकोणला आले त्या प्रत्येक वेळी दिलेली आहेत. उपसभापती फर्नांडिस यांच्या मध्यस्थीतून पणजीला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. परंतु हा ज्वलंत प्रश्न विचारात घेतला जात नसल्यामुळे पंचायत क्षेत्रातील विकासकामांवर परिणाम झाल्याचा दावा लोलये-पोळेचे सरपंच सचिन नाईक यांनी केला आहे.