प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याच्या बाबतीत काणकोणच्या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी गोवा जनसेनेच्या माध्यमातून या आणीबाणीच्या काळात सेवा देण्यासाठी खास वाहनाची सोय केली आहे. नुकताच श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानजवळ देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी बावटा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.
यावेळी श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे पुजारी वेळीप, काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत, प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव महादेव देसाई, रामा काणकोणकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्याच्या विविध भागांतील लोकांना लसीकरणाच्या स्थळी आणणे आणि परत त्यांच्या स्थळी पोहोचविण्याचे काम हे वाहन मोफत करणार असून गोवा जनसेनेने केवळ माणुसकीच्या भावनेतून हे छोटेसे काम केले असल्याचे यावेळी काणकोणकर यांनी स्पष्ट केले. मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून भंडारी यांच्या जनसेनेने केलेल्या कार्याचे राजेंद्र देसाई, महादेव देसाई तसेच भगत यांनी कौतुक केले आणि या योजनेला शुभेच्छा दिल्या. सध्या सदर वाहन काणकोणच्या विविध भागांतील नागरिकांना लसीकरणासाठी नेण्याचे व आणण्याचे काम करत आहे.