कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन वाढवावे : जागरूक नागरिकांचे आवाहन
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची काणकोणच्या जागरूक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी धास्ती घेतली असून सरकारने जो चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता त्याला अनुसरून रविवारी तिसऱया दिवशी देखील काणकोणची प्रमुख बाजारपेठ बंद राहिली. त्यासाठी काणकोणच्या व्यापारी वर्गाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील घरातून बाहेर न पडणे पसंत केल्याबद्दल जागरूक नागरिकांनी जनता तसेच व्यापारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.
ही साखळी तोडण्यासाठी अजून चार दिवस काणकोण तालुक्यात लॉकडाऊन कायम ठेवावा आणि यासाठी काणकोणच्या व्यापारी वर्गाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चार दिवसांत चावडीवरील प्रमुख केंद्र असलेले गोवा बागायतदार भवन देखील बंद ठेवण्याच्या दृष्टीने विचारविनिमय चालू असून गोवा बागायतदारचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांच्याशी याबाबतीत चर्चा झाली असल्याची माहिती सर्वानंद भगत यांनी यावेळी दिली.
हा लॉकडाऊन केवळ चावडीपुरताच मर्यादित न ठेवता गुळे ते पोळेपर्यंतच्या सर्व बाजारपेठा तसेच गावडोंगरी, खोतीगाव, आगोंद आणि खोलपर्यंतच्या सर्व व्यापारी वर्गाने या लॉकडाऊनमध्ये स्वखुशीने सहभागी होण्यासाठी स्थानिक पंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्या त्या भागाशी यासंदर्भात संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरदिवशी किमान 50 ते 60 रुग्ण या तालुक्यात आढळतात. त्यामुळे काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचारी यांच्यावर ताण पडू लागला आहे. तरी देखील ज्या पद्धतीने ते काम करतात त्याबद्दल सर्वांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. ही साखळी तोडण्यासाठी आणि काणकोणच्या जनतेच्या आरोग्याचा विचार करून अजून थोडी कळ सोसावी, असे आवाहन माजी आमदार विजय पै खोत यांनी यावेळी बोलताना केले.
कोविड केअर सेंटरची मागणी
काणकोण तालुक्यात दरदिवशी 150 पेक्षा अधिक जणांची चाचणी होत नाही. त्याचप्रमाणे या तालुक्यात सामाजिक आरोग्य केंद्र सोडल्यास खासगी इस्पितळाचीही सोय नसल्यामुळे काणकोणच्या रुग्णांची आबाळ होत असते. जे रुग्ण आपल्या घरी विलगीकरणात राहतात त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नसतात. याचा विचार करून या तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवरून प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भात चर्चा करून पुढील कृती करण्याच्या दृष्टीने 2 रोजी चावडीवरील मंगलवन कॉम्प्लेक्सजवळ जे नागरिक जमले होते त्यात माजी आमदार पै खोत, श्रीस्थळचे सरपंच दत्ता गावकर, माजी नगराध्यक्ष अजय भगत, चावडी वॉर्डाचे नगरसेवक रमाकांत ना. गावकर, मास्तीमळ वॉर्डाचे नगरसेवक धीरज ना. गावकर, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, सरचिटणीस दिवाकर पागी, दक्षिण गोवा भाजपाचे सरचिटणीस सर्वानंद भगत, सामाजिक कार्यकर्ते शांताजी गावकर, संजय कोमरपंत, बबेश बोरकर, सम्राट भगत, अभय तेलेकर, रमेश कोमरपंत, शंकर नाईक आणि इतरांचा समावेश होता. या नागरिकांच्या प्रतिनिधीने काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता आपला पुढील लॉकडाऊनला पाठिंबा आहे आणि या सर्व गोष्टी आपण मुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.