प्रतिनिधी / काणकोण
चावडी-काणकोण येथील बसस्थानकावर जंतुनाशकांचा फवारा मारून संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला आहे. काणकोणच्या अग्निशामक दलाच्या पथकाने दोन वेळा कदंब बसस्थानक, चावडीवरील रिक्षा स्टँड तसेच जुन्या बसस्थानकाचे निर्जंतुकीकरण केले.
कदंब बसस्थानकावर 22 मार्चपासून पार्क करून ठेवलेल्या सर्व बसगाडय़ांमध्ये जंतुनाशकांचा फवारा मारण्याचे काम कदंबच्या कर्मचाऱयांनी केले आहे आणि संपूर्ण परिसर निर्जंतुक केला आहे. त्यामुळे इतके दिवस बंद असलेली सार्वजनिक वाहतूक सुरू होण्याचे संकेत मिळाले असले, तरी ही सेवा पूर्ववत सुरू होईल की, अंशतः तसेच ग्रामीण भागांतील बससेवा सुरू होणार की नाही याचा अंदाज मिळालेला नाही. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली असून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केल्यास देखील उगाच नागरिकांनी गर्दी करू नये, असा संदेश देत काणकोणचे पोलीस सर्वत्र फिरत आहेत.