भाजप पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचीही भेट घेतल्याने गोंधळाचे वातावरण
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण पालिकेत सत्तेवर आलेले मंडळ नेमके भाजपाचे आहे की काँग्रेसचे असा प्रश्न निर्माण झाला असून काणकोण नगरपालिकेचे राजकारण अगदी खालच्या थरावर पोहोचल्याची प्रतिक्रिया पालिकेतील ज्येष्ठ नागरिक आणि निष्ठांवत पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त व्हायला लागली आहे.
पालिका निवडणुकीच्या वेळी भाजप किंवा काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपले पॅनल जाहीर केले नव्हते. मात्र 22 रोजी झालेल्या निकालानंतर काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी निवडून आलेले 12 ही नगरसेवक भाजपाचे असल्याचे सांगून या सर्वांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व संघटनमंत्री सतीश धोंड यांची भेट घडवून आणली होती. या घटनेला 24 तास देखील उलटले नाहीत तोच सायमन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांनी स्वतंत्र गट तयार करून परत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि हा जो गट आहे तो भाजपाचाच असल्याचे घोषित केले होते.
बाजूला राहिलेल्या पाच नगरसेवकांनी परत एकदा पक्षाध्यक्ष तानावडे व मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि काणकोणच्या एकंदर राजकारणाची माहिती दिली होती. या गटात काणकोण भाजप मंडळाच्या सचिव असलेल्या नीतू देसाई यांचा समावेश असून हा गट खरा भाजपाचा असल्याचे पक्षाध्यक्षांना सांगितल्यानंतर काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत यांच्या उपस्थितीत या गटातर्फे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी अनुक्रमे धीरज गावकर आणि सुप्रिया देसाई यांनी अर्ज दाखल करण्याचे ठरले होते. मात्र निवडणुकीत दोघांचाही पराभव झाला.
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाची निवडणूक जिंकल्यानंतर सातही नगरसेवकांनी भाजपाचे पक्षाध्यक्ष तानावडे आणि उपसभापती फर्नांडिस यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचीही भेट घेतली. स्वतः कामत यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांना पेढा खायला दिला. यामुळे काणकोण पालिकेतील हा जो सत्ताधारी गट आहे तो नेमका भाजपाचा की काँग्रेसचा असा संभ्रम काणकोणवासियांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच माजी मंत्री रमेश तवडकर यांनी निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आणि उर्वरित सत्ताधारी गटाची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्याचा प्रकार घडल्यामुळे संशयाला अधिक चालना मिळाली आहे. या मंडळाची भाजपाचे पक्षाध्यक्ष तानावडे आणि विरोधी पक्षनेते कामत यांच्याबरोबरची छायाचित्रे सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहेत.