उत्कंठा शिगेला : भाजप, काँग्रेस, तृणमूल, अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत
प्रतिनिधी /काणकोण
मतमोजणी 10 रोजी होणार असून त्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नेमका कोणता उमेदवार या निवडणुकीत बाजी मारेल हे छातीठोकपणे कोणीही सध्या सांगू शकत नसला, तरी देखील काही उमेदवारांनी मात्र आपणच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला असून काही उमेदवारांच्या समर्थकांनी तर विजय साजरा करण्याची जय्यत तयारी केली असल्याची चर्चा ऐकिवात आहे.
काणकोण मतदारसंघातून यंदा काँग्रेंसतर्फे जनार्दन भंडारी, भाजपतर्फे रमेश तवडकर, तृणमूल काँग्रेसतर्फे महादेव देसाई आणि अपक्ष उमेदवार म्हणून इजिदोर फर्नांडिस, विजय पै खोत रिंगणात आहेत. त्यातील तवडकर यांच्याबरोबर पै खोत आणि फर्नांडिस हे भाजपाशी संबंधित राहिलेले असल्यामुळे या ठिकाणी भाजपाच्या मतांमध्ये मोठय़ा प्रमाणात विभाजन होणार असल्याचे चित्र पूर्वीपासूनच दिसत होते.
त्याचबरोबर काँग्रेसच्या भंडारी यांना शह देण्यासाठी तृणमूलतर्फे निवडणूक लढविलेले देसाई यांच्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये देखील फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येते. एकंदर पाहता संपूर्ण मतदारसंघात भाजपविरोधी असे वातावरण तयार झाल्यामुळे भाजपाचे उमेदवार तवडकर यांच्या विरोधात या ठिकाणी मतदान झाले असण्याची शक्यता जरी वर्तविण्यात येत असली, तरी मतदार नेमके कोणाच्या बाजूने राहिले आहेत याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.
असे जरी असले, तरी या मतदारसंघातील काही उमेदवारांनी विजयाची खात्री व्यक्त केली असून काही जणांनी विजयश्री साजरी करण्यासाठी सभागृह आरक्षित केलेले आहे. काही जणांनी बँड पथकाची सोय केलेली आहे. काही जणांनी रॅली काढण्याची तयारी केली आहे. तर काही उमेदवारांनी म्हणे जे सरकारी कर्मचारी आपल्या विरोधात गेले त्यांच्या इतरत्र बदलीची तयारी करतानाच त्यांना आपली बॅग भरून तयार राहण्याचा इशारा दिला आहे, अशी चर्चा सध्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. काहींनी विजयी झाल्यानंतर पीए कोण असेल, चालक कोण असेल याची देखील म्हणे यादी तयार ठेवली आहे. त्यामुळे काणकोणातील काही उमेदवारांचे समर्थक भलतेच उमेदीत असल्याचे दिसत आहे.