गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे उद्गार
प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण मतदारसंघाच्या विकासासाठी गोवा फॉरवर्ड स्वतंत्र जाहीरनामा करणार असून यापुढे वाडय़ावाडय़ावर कोपरा बैठका घेण्यात येणार आहेत. काणकोणला परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी नव्या चेहऱयाची या ठिकाणी गरज असल्याचे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई यांनी काणकोण येथील बेर्नाद ग्रासियस प्लाझामध्ये पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना व्यक्त केले.
या उद्घाटन सोहळय़ाला आमदार जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, पक्षाचे काणकोणचे संभाव्य उमेदवार प्रशांत नाईक, सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, मडगावचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, माजी नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई, दिलीप प्रभुदेसाई, दुर्गादास कामत उपस्थित होते. बेडकाप्रमाणे उडय़ा मारणाऱया लोकप्रतिनिधींमुळे काणकोण मतदारसंघ आजवर दुर्लक्षित राहिला. काणकोण ही ब्द्धिवंतांची खाण असताना निवडणुकीच्या वेळी मात्र येथील मतदार आमिषांना बळी पडून अकार्यक्षम उमेदवाराची निवड करतात, अशी खंत सरदेसाई यांनी व्यक्त केली.
भाजपने गोव्याचा लिलाव चालविला आहे. पक्षांतर केलेल्या सर्वांचा मीटर व्यवस्थित चालत असून आपले सरकार आल्यास स्थानिकांना न्याय दिला जाईल. येथील पर्यटन क्षेत्राला वाव दिला जाईल, असे सांगून सरदेसाई यांनी, एकेकाळी विद्यार्थी चळवळीतील प्रमुख नेते राहिलेल्या प्रशांत नाईक यांच्या विजयासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. आपण मागच्या दोन दिवसांपासून काणकोणला असून कित्येक जणांशी वैयक्तिक चर्चा केलेली आहे. प्रत्येकाला या मतदारसंघात बदल झालेला हवा आहे. येथील राजकारण जे तीन व्यक्तींच्याच मागे फिरत आहे त्याला यावेळी लगाम घाला, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
काणकोणवासियांचा आवाज उठविणाऱयाची गरज
काणकोणच्या जनतेचा आवाज विधानसभेत उठविणाऱया व्यक्तीची आज गरज असून आपल्याला मत दिले म्हणून कोणावरही पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. याची खात्री आपण देतो, असे सांगून प्रशांत नाईक यांनी सत्ताधारी गटातील आमदारावर आगपाखड केली. गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतर देखील येथील कुमेरीचा प्रश्न सुटत नाही. पाणी आणि विजेची समस्या सुटत नाही. खोलची मिरची टपालावर आली म्हणून मिरची पिकविणाऱयांचे प्रश्न सुटत नाहीत, असे ते म्हणाले. आपण एक कुळवाडी आणि स्वातंत्र्यसैनिकाचे पुत्र असून प्रत्येक वेळी इतरांसाठीच आपण काम करावे का, असा सवाल नाईक यांनी केला. एकदाच मतदारसंघासाठी काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्यांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश
आमदार पालयेकर, साळगावकर, कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, सरचिटणीस लोलयेकर यांनी पक्षांतर केलेले आमदार इजिदोर फर्नांडिस तसेच भाजपाच्या कार्यप्रणालीवर तोंडसुख घेतले. गोवा फॉरवर्ड सत्तेवर आल्यास नोकऱयांसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. गुंडगिरी कमी होण्यासाठी भाजपाला दारे बंद करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खोतीगावचे माजी सरपंच महादेव गावकर, जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार रॅमी बोर्जिस, भाजपाचे कार्यकर्ते विकास भगत, गुरू बांदेकर, लोलये येथील एनेस्तिना सिल्वा, उमेश तुबकी, दाभेल येथील बोंबो बावधान यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. भगत, बोर्जिस, गावकर यांनी काणकोणात बदल होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून नाईक यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला विविध भागांतून आलेल्या 400 पेक्षा अधिक नागरिकांचा समावेश होता. त्यात महिलांचा अधिक समावेश होता. त्याला सुरुवात करण्यापूर्वी विजय सरदेसाई, प्रशांत नाईक आणि अन्य नेत्यांनी श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देव, चावडीवरील सेंट तेरेझा चर्च आणि कोळंब येथील मशिदीला भेट दिली. ढोल आणि ताशांच्या गजरात चावडीवरील सेंट तेरेझा चर्च ते पक्ष कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त शेळेर ते पक्ष कार्यालयापर्यंत सर्वत्र पक्षाचे ध्वज लावण्यात आले होते. सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले. अभिजित पागी यांनी स्वागत केले.