वार्ताहर / कास :
दिनांक १ मे २०२१ पासून कोयना धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिलेले होते. त्याची अंमलबजावणी सातारा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. कांदाटी खोऱ्यात संकलन यादीचे रितसर चावडी वाचन करून हरकती नोंदवून घेतल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे खरा प्रकल्पग्रस्त या धरणग्रस्तांनच्या पर्यायी जमिनीचे वाटप कार्यक्रमापासून वंचित राहणार आहे त्यामुळे श्रमीक मुक्ती दलाने पुकारलेल्या आंदोलनात कादांटी विकास संघासह दुर्गम कांदाटी खोऱ्यातील प्रकल्पग्रस्त सामील झाले आहेत.
सातारा जिल्हा प्रशासनाच्या वेळखाऊ वृत्तीला आळा घालण्यासाठी साठ वर्षापासुन प्रलंबीत असणाऱ्या मागण्यांना न्याय मिळण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाने जे आंदोलन सुरू केलेले आहे. त्या आंदोलनात महाबळेश्वर तालुक्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा आहे. कांदाटी खोऱ्यात कार्यरत असणारा कंदाटी विकास संघ- मुंबई या संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आहे व श्रमिक मुक्ती दलासोबत असल्याची माहीती अध्यक्ष मारूती कदम, सचिव हणमंत भोसले, रमेश शिंदे, बबन चव्हाण, सिताराम जाधव राजाराम जाधव आदीनी दिली. जो पर्यंत कोयना धरणग्रस्तांचा जमिन वाटपाचा प्रश्न योग्यरित्या मार्गी लागत नाही तोपर्यंत या आंदोलनामध्ये कांदाटी विकास संघ असेल.
कोरोनाच्या नियमांचे पालन करुन, योग्य ती काळजी घेऊन पूर्ण ताकतीने संघ आंदोलनात सहभागी राहील. कांदाटी विकास संघासी संबंधित कांदाटी खोऱ्यतील सर्व मुंबईकर मंडळी आणि खोऱ्यातील ग्रामस्थ या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाबरोबर आंदोलनात सहभागी असतील.