शिराळा / वार्ताहर
कापरी (ता.शिराळा) येथे बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. कापरी येथील उत्तम भिमराव पाटील यांच्या इंगरुळ पाझर तलावाजवळील लव्ह्याचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारातील जनावरांच्या शेडमध्ये घुसून खोंडावर बिबट्याने हल्ला केला. या हल्यात खोंडाचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उत्तम पाटील हे सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास जनावरांना पाणी व वैरण घालून शेतामधील इतर कामास गेले होते. यावेळी दुपारी बाराच्या सुमारास बिबट्या शेडच्या कुडातून आत घुसला व त्याने खोंडावर हल्ला केला. या हल्यात खोंडाचा मृत्यू झाला.
उत्तम पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास जनावरांना पाणी व वैरण घालण्यासाठी आले असता त्यांच्या निदर्शनास सदर घटना आली. यावेळी वनविभागाचे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल प्रकाश पाटील यांनी पंचनामा केला असता वाघाचे ठसे पहावयास मिळाले.