वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 29 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्याला भयंकर चूक मानत अमेरिकेने माफी मागितली आहे. या हल्ल्यात 10 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यात 7 मुले सामील होते असेही अमेरिकेने पहिल्यांदाच म्हटले आहे.
काबूलमधील ड्रोन हल्ला इस्लामिक स्टेटच्या संशयास्पद कारवाईला लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता. इस्लामिक स्टेट काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडे होती असे अमेरिकेच्या सैन्याच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथे मॅकेन्झी यांनी सांगितले आहे.
काबूलमधील ड्रोन हल्ल्याच्या चौकशीनंतर अमेरिकेने हे विधान प्रसिद्ध केले आहे. काबूलमधील हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. आम्ही माफी मागतो आणि या भयंकर चुकीपासून धडा घेऊ असे आश्वासन देत असल्याचे उद्गार संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी काढले आहेत. मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबांची भरपाई कशी करावी यासंबंधीचे आकलन सरकार करत असल्याचे जनरल मॅकेन्झी यांनी सांगितले आहे.
गुप्तचर अहवाल चुकीचा
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने एका ठावठिकाण्याचा शोध लावला होता, तेथून इस्लामिक स्टेटचे दहशतवादी काबूल विमानतळावर हल्ल्याची तयारी करत होते. गुप्तचर यंत्रणेने एका पांढऱया रंगाची टोयोटा कोरोला कारवर नजर ठेवा असे सैन्याला सांगितले होते. त्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने त्या संशयास्पद टोयोटा कारला 8 तासांपर्यंत ट्रक केले आणि त्यानंतर हालचाली पाहता निश्चित करण्यात आलेल्या भागात तिला लक्ष्य करण्यात आले. पण या कारबद्दलचा इंटेलिजेन्सचा अहवाल चुकीचा होता असे जनरल मॅकेन्झी म्हणाले.
निर्णयाचा बचाव
मॅकेन्झी यांनी ड्रोन हल्ल्याच्या निर्णयाचा बचाव देखील केला आहे. काबूल विमानतळावर आमच्या एअरलिफ्ट मोहिमेदरम्यान इस्लामिक स्टेटच्या हल्ल्याचा धोका पाहता ड्रोन हल्ला करण्यात आला होता. तेव्हा आम्ही अशा 60 हून अधिक धोक्यांना तोंड देत होतो. ड्रोन हल्ल्यावेळी तेथे कुठलाच नागरिक दिसून आला नव्हता असा दावा मॅकेन्झी यांनी केला आहे. पांढऱया रंगाच्या संशयास्पद कारमध्ये स्फोटके असल्याचा संशय अमेरिकेच्या अधिकाऱयांना होता. पण न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार या कारमध्ये पाण्याने भरलेले कॅन ठेवण्यात आले होते.