विमानतळाबाहेर दोन शक्तिशाली स्फोट : 4 अमेरिकी सैनिकांसह 15 ठार
दहशत…
- विमानतळावर अराजकाचे वातावरण
- ईटलीच्या विमानावर बेछूट गोळीबार
- मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी दोन मोठे स्फोट झाले. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात किमान 4 अमेरिकन सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विदेशी नागरिकांसह लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. तसेच हल्ल्यातील जखमींचा आकडाही मोठा असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर गोळीबाराच्या घटनाही घडल्यामुळे सर्व विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
काबूल विमानतळावर झालेल्या स्फोट-हल्ल्यानंतर अराजकाचे वातावरण आहे. हा हल्ला तालिबानने केला की ते इसिसचे कृत्य आहे याबाबत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. पेंटागॉननेही आत्मघाती हल्ल्याची पुष्टी दिली असून आतापर्यंत चार अमेरिकन सैनिक मृत्यूमुखी पडले असून अन्य काहीजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दोन शक्तिशाली स्फोट झाल्यानंतर विमानतळावर सतत गोळीबारही सुरू होता. गोळीबार आणि स्फोटामध्ये अनेक अफगाणी मारले गेले. तसेच अनेक जण जखमीही झाले आहेत. एका इटालीयन विमानावर गोळीबार झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
नागरिकांना केले होते सतर्क, पण…
काबूलमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्मयता गुप्तचर विभागांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली होती. या शक्यतेनंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने आपल्या नागरिकांना सध्या काबूल विमानतळावर न जाण्याची सूचना केली होती. तसेच विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्यांनी लगेच तेथून दूर जावे, असे निर्देशही जारी केले होते. अमेरिकन सैनिकांनीही अबे गेट, ईस्ट गेट किंवा उत्तर गेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी त्वरित निघून जावे आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी, असे म्हटले आहे.
विमान वाहतूक थांबविण्याची फ्रान्सची घोषणा
अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह अनेक देश काबूलमधून आपापल्या लोकांना मायदेशी नेण्यात गुंतले आहेत. दरम्यान, फ्रान्सने 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीच्या चार दिवस आधी शुक्रवारपासून आपली उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रात्रीनंतर काबूल विमानतळावरून इव्हॅक्मयुएशन फ्लाईट चालवणार नसल्याची माहिती फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी दिली आहे.