प्रतिनिधी / कोल्हापूर
विविध क्षेत्रातील कामगार दिवसभराच्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून नाटकाची रंगीत तालीम करतात. घर, संसार सांभाळत कला जपणे, त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे संयमाचे काम आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेला नाटय़महोत्सव कामगारांच्या कलागुणांना वाव देणारे एक व्यासपीठच आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे विभागीय 67 वा नाटय़महोत्सवाच्या पडदा गुरूवारी डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उघडला, याप्रसंगी ते बोलत होते. हा नाटय़महोत्सव संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात 24 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून 18 नाटय़संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. उद्घाटनप्रसंगी सिने व नाटय़ अभिनेते आनंद काळे, नगरसेवक संभाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय कटके लिखित ‘डबल डिल’ या नाटकाने नाटय़महोत्सवाला सुरूवात झाली.
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, कामगार कल्याण मंडळ राज्यभरातील कामगारांना नाटय़महोत्सवाच्या निमित्ताने एकत्रित करीत आहे, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. यातून स्नेह वाढतो, तसेच कामगारांना आपल्या कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. अशा महोत्सवातून त्या त्या भागातील सांस्कृतिक देवाण-घेवाण होते. कारण यातूनच मोठे कलाकार घडू शकतात.
सिने व नाटय़ अभिनेते आनंद काळे म्हणाले, कामकार कल्याण मंडळाच्या नाटय़स्पर्धेतूनच मी कलेला सुरूवात केली. या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसानेच मला अभिनेता बनण्याचे प्रोत्साहन दिले, म्हणूनच मी आज सिनेअभिनेता झालो आहे. त्यामुळे या स्पर्धा म्हणजे माझा आत्मा आहे. या स्पर्धेतून समाजात घडणाऱया राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह इतर सर्वच विषयावर प्रकाश टाकला जातो. नवनवीन विषय समोर येतात, त्यामुळे अशा स्पर्धा होणे आवश्यक आहे. नगरसेवक संभाजी जाधव यांनी कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांना मिळणाऱया योजनांचे कौतुक केले. तसेच कलाकारांना सुभेच्छा दिल्या.
कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. सांगलीचे प्रभारी कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र निकम यांनी आभार मानले. यावेळी परिक्षक संजय हळदीकर, शफी नायकवडी, संजय तोडकर आदी उपस्थित होते.