प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रकल्पामध्ये दाभोळ वीज प्रकल्प कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्याबाबतचा न्यायालयीन लढा सुरू आहे. यामध्येच कंपनीने बायोमेट्रिक थम्सची लावलेली नियमावली कामगारांनी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी सोमवारी पूर्ण दिवस व मंगळवारी दुपारपर्यंत कामगार कंपनी गेटबाहेर राहिले. मात्र कंपनी व कामगार यांच्यामध्ये अंतर्गत समझोता झाल्याने कामगारांनी अखेर बायोमेट्रीक थम्स स्वीकारले. यामुळे कंपनीने मंगळवारी दुपारी 12 वाजता सर्व कामगारांना कंपनीमध्ये प्रवेश दिला.
अंजनवेल येथील पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पातील कायमस्वरूपी असलेल्या दोनशे कामगारांनी आपणाला आरजीपीपीएल कंपनीमध्ये कायमस्वरूपी सामावून घ्यावे याबाबत कोल्हापूर कामगार आयुक्तांकडे केलेल्या दाव्याचा निकाल कामगारांच्या बाजुने लागला, परंतु मार्च 2017 मध्ये कंपनीने या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये अपिल केले आहे. सदर केस अद्यापपर्यंत उभी राहिलेली नाही. यामुळे त्याचा निकाल लागेपर्यंत कंपनी आणि कामगारांमध्ये कोणताही समझोता नको अशाप्रकारचे निर्बंध लागले आहेत, परंतु 11 मार्च रोजी सर्व कामगारांना बायोमेट्रीक थम्स देऊन कामावर हजर होण्याचा नियम कंपनीने लावला. यामुळे सोमवारी सदर बायोमेट्रीक थम्स कामगारांनी नाकारले. थम्स नाकारल्याने कंपनीने कामावर हजर करून घेण्यास नकार दर्शविला. यामुळे 143 कामगार सोमवारपासून कंपनीच्या गेटबाहेर राहिले होते.
सोमवारी दिवसभर कामगारांच्या या धोरणाबाबत कंपनीबरोबर बैठका पार पाडल्या. रात्री उशिरापर्यंत बैठका होऊनही निर्णय नाही. यामुळे मंगळवारीही सकाळी कामगार कंपनीबाहेरच होते. दुपारी 12 वाजता कामगार व कंपनी यांच्यामध्ये अंतर्गत समझोता होऊन सदर बायोमेट्रीक थम्स स्विकारल्याचे न्यायालयीन लढय़ामध्ये अंतर्भूत केले जाणार नाही या हमीवर कामगारांना कंपनीमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र यामध्ये कामगारांना कंपनीच्या नियमाप्रमाणे कामावर हजर होताना बायोमेट्रीक थम्स स्विकारावे लागले असून सर्व कामगारांचे थम्स घेऊन कामावर हजर करून घेण्यात आले, अशी माहिती दाभोळ वीज प्रकल्प कामगार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत महाडीक यांनी दिली.