काकोडा येथील प्रविणा इंडस्ट्रीजचे मालक अँथनी मेंडोन्सा यांचा दावा : मागील दीड महिन्यात दगडफेकीचे वारंवार प्रकार, तक्रारी करूनही उपयोग नाही
प्रतिनिधी / कुडचडे
आज कुडचडेत गुन्हेगारीत वाढ होत चालली असून आताच लोकांनी सतर्क झाले पाहिजे. कारण आपण एक व्यावसायिक आहे व गेल्या कित्येक वर्षांपासून काकोडा औद्योगिक वसाहतीत व्यवसाय करत आहे. पण अलीकडे आपल्या प्रविणा इंडस्ट्रीज आस्थापनासंदर्भात घडलेल्या घटना या कायद्याचे उल्लंघन करून घडल्या आहेत. आता त्यात आपल्या एका कामगारावर झालेल्या सुरीहल्ल्याची भर पडली आहे, असा दावा प्रविणा इंडस्ट्रीज आस्थापनाचे मालक अँथनी मेंडोन्सा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
यात मे महिन्यात आपल्या आस्थापनावर दगड फेकण्यात आले व त्यामुळे आस्थापनाच्या छपरावर घातलेले किती तरी पत्रे फुटले व नुकसान झाले. यासंबंधी आपण कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार केली. त्यानंतर कोणतीच कारवाई न करता पोलिसांकडून सांगण्यात आले की, सीसी टीव्ही कॅमेरे बसवा. हजारो रुपये खर्च करून आपण कॅमेरे बसविले व फुटलेले पत्रे बदलले. त्यानंतर आपला मुलगा आस्थापनाच्या जागेत स्वतःच्या मोबाईल फोनवर बोलत असताना अचानक अज्ञाताने त्याच्यावर दगड फेकला. पण सुदैवाने सदर दगड त्याला लागला नाही. कॅमेरे लावल्यानंतर हल्लीच परत एकदा आस्थापनावर दगड फेकून पत्रे फोडण्यात आले. यासंबंधीही तक्रार केली असून पाऊस जास्त पडत असल्याने दगड कोठून फेकला व कोणी फेकला हे कॅमेऱयात समजू शकले नाही, असा दावा यावेळी मेंडोन्सा यांनी केला.
खेकडे पकडण्यास गेल्यावेळी सुरीहल्ला
त्यानंतर शनिवार 12 जून रोजी आस्थापनातील कामगार पाऊस सुरु झाल्यामुळे खेकडे पकडण्यासाठी बाजूला असलेल्या शेतात गेले होते. त्यावेळी तिघांपैकी एकावर सुरीहल्ला करण्याची घटना घडली. त्यावेळेस आपण नातेवाईकांकडे गेलो होतो. तेव्हा कामगारांनी आपल्याला सदर घटनेबद्दल माहिती दिली. तेव्हा आपण त्यांना 100 क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले. पण ज्यावेळेस त्यांनी सदर क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना बिगरगोमंतकीय म्हणून महत्त्व दिण्यात आले नाही, असा दावा मेंडोन्सा यांनी केला. नंतर त्यांना इस्पितळात नेण्यात आले. सोमवारी आपल्याला पोलीस स्थानकात बोलाविण्यात आले त्या वेळेस आपण आपली पत्नी व मुलासोबत पोलीस स्थानकात गेलो. त्यावेळी कुडचडे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करून घेतला. पण त्यात आपण समाधानी नाही, असे त्यांनी सांगितले.
नगरसेवकाचा हात असल्याचा आरोप
कारण ज्या व्यक्तीवर सदर खुनी हल्ला झाला त्याने कृत्य करणाऱयाला ओळखल्याचे सांगून सुद्धा सदर गुन्हा करणाऱयावर कुडचडे पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली नाही. ही कुडचडेवासियांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. यात स्थानिक नगरसेवकाचा हात असून त्यांनी जे बेकायदेशीर बांधकाम औद्योगिक वसाहतीत केले आहे ते उघड करण्यात येईल या भीतीने हा हल्ला करण्यात आला असावा, असा आरोप मेंडोन्सा यांनी केला. असा हल्ला कोणावरही होऊ शकतो व तेव्हाही अशीच राजकारण्यांच्या हितार्थ पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार नाही व ज्याच्यावर अन्याय होईल त्याला न्याय मिळणार नाही. कुडचडेत स्थानिक राजकारण्यांचा वशिला घेऊन जो कारभार चालला आहे तो चुकीचा आहे. हे उघड व्हावे व या प्रकरणी कुडचडे पोलीस स्थानकातून नीट कारवाई होत नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत पोहोचावी हाच ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आहे. या प्रकरणी आपण संबंधित उपअधीक्षकांना तसेच पोलीस अधीक्षकांनाही भेटणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.