पुलाची शिरोली / वार्ताहर
कामगाराचा हात तुटून अपंगत्व येण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कणेरी इंडस्ट्रीजचे मालक श्रेणीक पाटील सध्या रा. रुईकर कॉलनी मुळ गाव निमशिरगाव, ता. शिरोळ यांच्यासह ठेकेदारावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहूल महादेव पाटील वय वर्षे २३ रा. माळवाडी पाडळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
शिरोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रेणीक पाटील यांचा शिरोली औद्योगिक वसाहतीत कणेरी इंडस्ट्रीज नावाचा मशिनशॉप आहे. या कारखान्यात ठेकेदार कंपनीमार्फत राहूल हा कामास होता. तो मशिन शॉपमध्ये काम करीत असताना कन्व्हेर बेल्टमध्ये उजवा हात सापडला. कंपनीचे मालक व ठेकेदार यांनी कामगाराच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही खबरदारी अथवा जबाबदारी घेतली नसल्यामुळे त्याच्या उजव्या हाताला गंभीर जखम होवून त्याचा हात निकामी झाला. तसेच त्याला योग्य वेळी उपचारासाठी संशयित आरोपी एक व दोन यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अशी फिर्याद जखमी राहूल याने दिली आहे. स.पो.नि. किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.