नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
दिल्लीतील गोविंद बल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्चकडून परिचारिकांना मल्याळम भाषा वापरु नये, असा आदेश जारी करण्यात आला होता. आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. प्रशासनाने एका आदेशाद्वारे कर्मचाऱ्यांना रुग्णालयाध्ये काम करताना मल्याळम भाषा वापरण्यावर बंदी आणली होती. यावर रुग्णालयाच्या प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस जारी केली असल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
दिल्लीच्या गोविंद बल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (जीआयपीएमईआर) संस्थेद्वारा काढण्यात आलेल्या परिपत्रकात परिचारिकांना रुग्णांसोबत संवादासाठी फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्याची सक्ती केली होती. आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
रुग्णालय प्रशासना्च्या या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, इतर भारतीय भाषांप्रमाणे मल्याळम भाषाही भारतीय आहे, त्यामुळे भाषेच्य़ा आधारे करण्यात येणारा भेदभाव बंद करा.
रुग्णालयात मल्याळम भाषेचा वापर होत असल्याची तक्रार एका रुग्णाने आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती. त्यानंतर हा आदेश काढण्यात आला होता. मात्र आता लगेचच हा आदेश रद्द करण्यात आला आहे. रुग्णालयाला माहिती न देता हे परिपत्रक काढण्यात आल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. वाढता विरोध पाहता हा आदेश मागे घेण्यात आला आहे.