नोकरदार लोक नेहमीच आपल्या मेहनतीच्या तुलनेत कमी पगार मिळत असल्याचा विचार करत असतात. अनेक लोक स्वतःच्या पगाराने संतुष्टही असतात. तर काही जणांना पगारवाढ व्हावी असे वाटत असते. पण इटलीत एका व्यक्तीला 15 वर्षांपासून कुठलेच काम न करता घरबसल्या वेतन मिळत राहिल्याची घटना घडली आहे.
इटलीच्या वैद्यकीय विभागात काम करणारा व्यक्ती कुठलीच नोटीस न देता मागील 15 वर्षांपासून कामावर येत नव्हता. या 15 वर्षांमध्ये त्याला दर महिन्याला वेतन मिळत राहिले आहे. एक महिना देखील त्याचे वेतन चुकलेले नाही.
पण याचा खुलासा होताच त्याच्या विरोधात फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे. व्यक्तीच्या खात्यात उर्वरित कर्मचाऱयांप्रमाणेच पगार जमा होत होता. हे सत्र मागील 15 वर्षांपासून सातत्याने सुरू होते.
2005 मध्ये आरोपीचे स्वतःच्या व्यवस्थापकाशी काही कारणांवरून भांडण झाले होते. त्याने व्यवस्थापकाला धमकाविले देखील होते. याच्या काही काळातच व्यवस्थापक निवृत्त झाला. आरोपी देखील याचदरम्यान कार्यालयात गैरहजर राहू लागला आणि असे करता-करता 15 वर्षे उलटून गेली.
पोलीस अलिकडेच एका अन्य फसवणुकीच्या आणि अनुपस्थित राहण्याच्या प्रकरणी चौकशी करत होते. तेव्हा या प्रकरणाविषयी देखील पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर विभागाशी पोलिसांनी चौकशी सुरू केली असता एका मागोमाग एक रहस्य समोर येत राहिले. एचआर विभाग आणि नव्या व्यवस्थापकालाही याचा कुठलाच सुगावा लागला नव्हता. एवढेच नाही तर आरोपी कार्यालयात का येत नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्नही कुणी केला नव्हता.
आरोपी व्यक्तीने सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीत प्रदीर्घ सुटी आणि वेतन मिळविण्याचा विक्रमच केला आहे. या व्यक्तीला 15 वर्षांमध्ये 5.38 लाख युरो (सुमारे 4.8 कोटी रुपये) वेतन मिळाले आहे. या व्यक्तीचे वय आता 67 वर्षे आहे. 15 वर्षांनी याचा खुलासा झाल्यावर विभागाच्या अनेक मोठय़ा अधिकाऱयांची झोपच उडाली आहे.