वार्ताहर/ देशमुखनगर
कामेरी (ता.सातारा) येथील गावात पुणेहून आलेल्या 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने गाव परिसरातील जनजीवन धास्तावले आहे. या घटनेच्या निमित्ताने पहिल्यांदाच कामेरी गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभागासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचार्यांनी सतर्क राहण्याच्या ग्रामस्थांना सूचना करत सर्वतोपरी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुणे येथून कोरोना बाधित व्यक्तीसह त्यांची पत्नी, मुलगा आणण्यासाठी नातेवाईक दुचाकीवरून गेला होता. येताना दोन बाईकवरून हे चौघेजण दि. 12 रोजी आले होते. घरी आल्यावर कोरोना बाधित व्यक्तीस खोकला व श्वास घ्यायला त्रास होऊ लागला असल्याने दि. 14 रोजी नांदगाव येथे उपचारासाठी गेले होते. मात्र सुरूवातीला सारीचे लक्षण दिसून येत असल्याने पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले. परंतु दि. 15 रोजी या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. या घटनेनंतर डॉ. चंद्रकांत सातपुते, नागठाणे येथील डॉ. आर. जी. कांबळे, डॉ. पराग जोशी यांच्यासह सुपरवायझर रेखा ठोंबरे, आरोग्य सेवक सी.एम.देशमुख व कर्मचाऱयांनी हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
यावेळी बेघरवस्ती येथील 250 मीटर अंतरावर मायक्रो कंटेनमेंन्ट झोन जाहीर केला असून या अंतर्गत एकूण 143 कुटुंबात 643 लोकसंख्या असलेल्या कंटेनमेंन्ट झोनमधील तसेच गावात सर्वत्र आरोग्य विभागा मार्फत आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी कामेरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुंदर घाडगे, उपसरपंच नानासाहेब घाडगे, ग्रामसेवक राजेंद्र कणसे, आरोग्य सेविका सुरेखा डांगे,हेमलता घाडगे, मनिषा घाडगे, संजय घोरपडे, चेअरमन संतोष घाडगे,तलाठी कैलास म्हैसनवाड, पोलिस पाटील तानाजी घाडगे उपस्थित होते.