ऑनलाईन टीम / बारामती :
स्पष्टवक्ते आणि रोखठोक स्वभाव असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यत्री अजित पवार नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. आजही बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. ‘काम करणारे पुढे या, मिरवणाऱयांनी बाजूला व्हा’ असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीत आज विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या परिसरात विविध संस्थांच्या वतीने आयोजित समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. बारामतीतील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी मिरवणारे बाजूला व्हा, ज्यांनी काम केले आहे, त्यांना पुढे येऊ द्या अशा शब्दात कानपिचक्या दिल्या.
यावेळी स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठानकडून 5 टँकर देण्यात आले. त्यावेळीही अजित पवारांनी ज्यांनी काम केले आहे. त्यांनी फोटोसाठी उभे रहा आणि बाकीचे बाजूला व्हा असे आपल्या खास शैलीत सांगत समाजोपयोगी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले. यामुळे फोटोसाठी नाहक पुढे पुढे करणाऱ्यांना चांगलाच चाप बसलाय हे मात्र नक्की.