- शिवसेना पदाधिकारी यांनी वेधले जिल्हा पोलिस अधीक्षकांचे लक्ष
- खासदार राऊत यांना फटकावणार असल्याच्या वक्तव्याचा निषेध
- निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला घातला चपलांचा हार
- निलेश राणे यांच्या विरोधात खासदार कार्यालयासमोर घोषणाबाजी
- गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी / ओरोस:
खासदार विनायक राऊत यांना फटकावणार व बंदोबस्त करणार असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केल्याने खासदार राऊत यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय सोशल मिडीयावरून अपमानास्पद मजकूर पसरवला जात आहे. यामुळे जिल्हय़ाची शांतता भंग होत आहे. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला निलेश राणे जबाबदार राहतील याकडे शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयाचे खासदार विनायक राऊत यांना दिसणार तिथे फटकावणार. तुमचा बंदोबस्त करणार अशी धमकी निलेश राणेनी दिल्याची बातमी 10 फेब्रुवारी रोजीच्या एका दैनिकात प्रसिध्द झाली आहे. राणेच्या या वक्तव्याला शिवसेनेने गुरूवारी पत्रकार परयीषद घेत आव्हान दिले आहे. तर शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे स्पशट केले होते.
दरम्यान शुक्रवारी सकाळी ओरोस येथील खासदार कार्यालयासमोर जिल्हाभरातील शिवसैनिकांनी एकत्र येत निलेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. तसेच निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय पडते यांनी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी असल्याचे सांगितले. संदेश पारकर यांनी राणेंच राजकीय वजन त्यांच्या मुलांनीच संपवल्याचा आरोप केला. सद्यस्थितीत जिल्हय़ात दहशतवादी संस्कृती घेऊन राणे भाजप निर्माण होत असल्याचे सांगितले. खासदार राऊत यांची सामाजिक आणि राजकीय उंची मोठी आहे. त्यामुळे राणेंच्या वक्तव्याने शिवसैनिक पेटून उठला आहे. पुढील निवडणुकीत राणे भाजप ला धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नसल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले. जिल्हय़ातील शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला निलेश राणेच जबाबदार असतील असे सतीश सावंत यांनी स्पष्ट केले. निलेश राणे भाजपने दिलेल्या पदाचा वापर करून स्टंटबाजी करत असल्याचा आरोप महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांनी केला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, अतुल बंगे आदेंसह जिल्हाभरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उतस्थित होते.