आपली नखं हा आरोग्याचा आरसा असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नखांवरून तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळू शकते. शरीरातलं एखादं दुखणं, पोषक घटकांची कमतरता याचा अंदाज नखांवरून लावता येतो. म्हणूनच नखांमधले बदल टिपल्यास तुम्ही वेळेत औषधोपचार करून घेऊ शकता.
- बरेचदा नखांवर लांब किंवा रूंद चट्टे पडलेले दिसतात तर कधी नखांचा रंग बदलतो. कधी नखांच्या रचनेतही बदल झाल्याचं पहायला मिळतं. काही वेळा नखं पटकन तुटून जातात. काही वेळा वेदनाही जाणवतात.
- नखांवर वेगवेगळ्या रंगाचे चट्टे पडतात. हे चट्टे पांढर्या रंगाचे असतील तर शरीरात पोषक घटकांची कमतरता आहे असं समजावं. हे चट्टे निळसर असतील तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो. यकृत किंवा फुफ्फुसाशी संबंधित तक्रारी असल्यास जांभळ्या रंगाचे चट्टे दिसू लागतात.
- केराटिन नामक प्रथिनाच्या कमतरतेमुळे नखांवर लांब चट्टे पडू लागतात. हा त्रास वाढल्यास नखांमध्ये नव्या पेशी तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.
- कॅल्शियम, प्रथिनं, झिंक अशा पोषक घटकांच्या कमतरतेमुळेही नखांवर चट्टे पडतात.
- जंतूसंसर्गामुळे नखं कठोर आणि आकाराने मोठी होतात. अशा परिस्थितीत तातडीने डॉक्टरांशी संपर्क करायला हवा.
- नखं पांढरी पडली असतील तर तुम्हाला ऍनिमिया असू शकतो.