लंडनच्या न्यायालयात अनिल अंबानींची साक्ष : फक्त एक कार असल्याचा दावा; पत्नी-कुटुंबावर निर्भर असल्याचीही स्पष्टोक्ती
लंडन, मुंबई / वृत्तसंस्था
‘अंबानी’ हे नाव घेतले किंवा ऐकले की लगेच एखाद्या गर्भश्रीमंत किंवा धनाढय़ाची प्रतिमा नजरेसमोर उभी ठाकते. मात्र, प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी लंडनमधील न्यायालयासमोर दिलेल्या ‘ऑनलाईन’ साक्षीमधून सर्वसामान्यांना थक्क करणारी माहिती पुढे आली आहे. आपण अत्यंत साधेपणाने जीवन जगत घरातील दागदागिने विकून दिवसामागून दिवस ढकलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्नी आणि कुटुंबाकडून आपल्या खर्चाचा भार उचलला जातो, असे रिलायन्स पॉवरचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी इंग्लंडच्या न्यायालयाला सांगितले.
चिनी बँकांकडून अवाढव्य कर्ज घेऊन ते अदा न करणाऱया उद्योगपती अनिल अंबानी यांनी शुक्रवारी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी त्यांनी साक्ष नोंदवली. कर्जाची पूर्तता करणे शक्मय न झाल्याने न्यायालयाने अंबानी यांना त्यांच्या सर्व मालमत्तांचा तपशील देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंबानी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लंडनच्या न्यायालयाला माहिती दिली. यावेळी चिनी बँकांच्या वकिलानेही त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले. त्यांनी बुडवलेल्या कर्जाच्या रकमेचे पैसे त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी लंडनच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.
एकेकाळी आपले नाव जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतले जात होते. मात्र सध्या माझा खर्च माझी बायको आणि कुटुंबातील इतर व्यक्ती उचलत असल्याचे अंबानी यांनी न्यायालयाला सांगितले. सध्या आपण अत्यंत साधेपणाने राहत आहे. आपण आई कोकिलाबेन यांना 500 कोटी आणि मुलगा अनमोल याला 310 कोटी रुपये देणे लागतो. आपल्याकडे उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नाही. जानेवारी ते जून 2020 दरम्यान आपण 9.9 कोटींचे दागिने विकल्याचे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे. आणखी खर्च करण्याची वेळ आल्यास आपल्याला इतर मालमत्ता विक्री करण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा करण्याखेरीज आपल्याकडे काही उपाय नाही, असे अनिल अंबानी यांनी न्यायालयातील साक्षीमध्ये सांगितले.
‘आलिशान’पणा गायब
आलिशान गाडय़ांच्या ताफ्याविषयी अंबानींना विचारले असता ‘ही निव्वळ अफवा’ असल्याचे स्पष्ट केले. आपल्याकडे एकही ‘रोल्स रॉईस’ नाही. सध्या आपण केवळ एकच कार वापरत असल्याचेही त्यांनी सांगितले. खाजगी हेलिकॉप्टरबाबत न्यायालयाने विचारणा केली असता व्यक्तिगत कारणासाठी त्याचा वापर न केल्यास त्याचा कोणताही खर्च आपल्याला उचलावा लागत नाही, असे अंबानी म्हणाले.
चीनमधील बँकांच्या कर्जाचे ओझे
चीनमधील चायना डेव्हलपमेंट बँक, एक्झिम बँक, आयसीबी यासारख्या बँकांनी अनिल अंबानी यांना भलीमोठी कर्जे दिली होती. या कर्जाच्या रकमेचा एकत्रित आकडा हा 15 हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. अनिल अंबानी यांनी रिलायन्स समूहावर 1 लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे. यात रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रा, आरकॉम आणि रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स पॉवर या कंपन्या कर्जात आकंठ बुडाल्या आहेत. यातील आरकॉमवर सर्वाधिक कर्ज असून त्याचा आकडा 47 हजार 234 कोटींपर्यंत पोहोचला आहे. 900 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेण्यासाठी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती, असा दावा चिनी बँकांनी लंडनमधील न्यायालयात केला आहे.