गोकाक-संगणकेरी मार्गावर अपघात : बहिण गंभीर जखमी ः कारचालक फरारी
वार्ताहर/ घटप्रभा
ऊस वाहतूक करणाऱया ट्रक्टर ट्रॉलीस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारने समोरून येणाऱया दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मामा-भाची ठार झाले तर बहिण गंभीर जखमी झाली. हा अपघात गोकाक-संगणकेरी मार्गावर घडला. अपघातानंतर कारचालक कार सोडून फरारी झाला. चैतन्य ईश्वर हडपद (वय 20) व अक्षरा मल्लाप्पा नाव्ही (वय 6) असे मृत मामा-भाचीचे नाव आहे. तर रुपा मल्लाप्पा नाव्ही (वय 32) असे जखमी बहिणीचे नाव आहे.
चैतन्य हा आपली मोटारसायकल क्र. के. ए. 24 एक्स 2459 वरुन आपल्या बहिण व भाचीला कल्लोळी (ता. गोकाक) येथे सोडण्यासाठी जात होता. दरम्यान मुडलगीहून गोकाककडे येणारी कार क्र. पीवाय 05 के 1156 च्या चालकाने ऊस वाहतूक करणाऱया वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस जोराची धडक दिली. यात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला तर अक्षरा हिला उपचारासाठी नेताना वाटेत तिचा मृत्यू झाला. रुपा यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सीपीआय श्रीशैल ब्याकूड, फौजदार बी. पी. मगदूम, आर. के. व्होळकार यांनी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.