सातारा / प्रतिनिधी :
सातारा एमआयडीसी परिसरात कारंडवाडी, ता. सातारा गावाच्या अलिकडे भोर फाटय़ावर असलेल्या चौकात एका कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
रविंद्र यशवंत शेलार (वय 40, रा. कारंडवाडी, ता. सातारा) असे कारमधील मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास सातारा ते कारंडवाडी रस्त्यावर एमआयडीसीतील चौकात एक कार रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यात एका व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही पाहणी केली. प्रथम दर्शनी तरी हा घातपाताचा प्रकार वाटत नसला तरी पोलिसांनी कारंडवाडीतील काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.