माजी विद्यार्थ्यांनी दिला 20 लाखांचा धनादेश
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात माजी विद्यार्थ्यांनी एका शिक्षकाला 77 व्या जन्मदिनी अनमोल भेट दिली आहे. शिक्षक जोस विलारुएल मागील 7 वर्षांमध्ये 24 वर्षे जुन्या कारमध्येच राहत होते. मेक्सिकोत राहत असलेल्या कुटुंबाला मदत करता यावी म्हणून त्यांनी ही काटकसर चालविली होती. त्यांचा साधेपण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जन्मदिनी 20 लाख रुपयांचा धनादेश भेटीदाखल दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या पुढाकारानंतर जोस भावुक झाले. या भेटीमुळे माझे जीवनच बदलले आहे. आता मी स्वतःचे घर घेऊ शकेन, असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
जोस कॅलिफोर्नियाच्या फोंटाना शहरातील शाळेत शिकवितात. कित्येक मुलांचे जीवन उत्तम क्हावे यासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱया शिक्षकाची मदत करणे कुठल्याही सन्मानापेक्षा कमी नाही. त्यांनी माझ्यासारख्या अनेक मुलांचे जीवन सुधारले आहे. त्यांच्याकडे 1977 ची फोर्ड थंडरबर्ड एलएक्स कार आहे, ज्याला त्यांनी स्वतःचे घरच केले आहे. अनेक वर्षांपासून त्यांना कारमध्येच राहत असल्याचे पाहत होतो. एके दिवशी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि फंड रेजिंग खाते तयार केले. माझे लक्ष्य 5 हजार डॉलर्स जमविण्याच होते. पण आम्ही 6 पट अधिक रक्कम म्हणजेच 27 हजार डॉलर्स जमा करू शकलो असे विधान माजी विद्यार्थी स्टीवनने केले आहे.
कोरोनामुळे समस्येत भर
जोस 2013 पासून कारमध्ये राहत होते. पण कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्याने त्यांचे जीवन अधिकच अडचणीत सापडले. त्यांना काम मिळणे अवघड झाले. ते भाडय़ाने घरही घेऊ शकत नव्हते. कारण त्यांना स्वतःच्या कमाईचा बहुतांश हिस्सा मेक्सिकोतील कुटुंबाला पाठवावा लागतो.