पारंपरिक मच्छीमारांची मत्स्य विभागाकडे तक्रार
प्रतिनिधी / मालवण:
दोन दिवसांपूर्वी मत्स्य विभागाने गोव्यातील एक एलईडी ट्रॉलर पकडूनदेखील मालवण व वेंगुर्ले समोरील समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱया बेकायदेशीर मासेमारीचा लखलखाट कायम असून या संदर्भात पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाला निवेदन सादर करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दांडी येथून पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारीस गेलेले महेंद्र पराडकर यांनी या संदर्भात मत्स्य विभागास निवेदन सादर करून एलईडी मासेमारी बंद करण्याची मागणी केली आहे. पराडकर निवती दीपस्तंभाजवळील 30 वाव खोल समुद्रात मासेमारीस गेले होते. सायंकाळी 7.30 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत एलईडी दिव्यांचा लखलखाट कायम होता. किमान सात ते आठ एलईडी ट्रॉलर मालवण ते वेंगुर्लेपर्यंतच्या समुद्रात होते ही बाब श्री. पराडकर यांनी मत्स्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली. काल दुपारी 2.30 वाजता आम्ही मासेमारीस गेलो आणि आज पहाटे 5.30 च्या सुमारास किनाऱयावर परतलो. एवढय़ा खोल समुद्रात मासेमारीस जाऊनसुद्धा आम्हाला केवळ दोन बुगडय़ा आणि सहा बांगडे मिळाले. ज्यात आमचा इंधन खर्चसुद्धा भागणार नाही अशी खंत श्री. पराडकर यांनी व्यक्त केली.
काल देवगडची गस्त होती
दरम्यान, काल मत्स्य विभागाची गस्ती नौका काय करीत होती? गस्तीला गेली होती का? असा सवाल मत्स्य अधिकाऱयांना केला असता काल गस्ती देवगडला गस्त घालत होती, असे सांगितले गेल्याचे श्री. पराडकर म्हणाले.