पाणी पुरवठा करण्यास ग्रामस्थांचा विरोध
प्रतिनिधी / धारबांदोडा
शिवडे धारबांदोडा येथील पाणी प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आल्यावर संबंधित चोरटय़ांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा शुक्रवारी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर मडगाव येथील पाणी विभागाचे वरिष्ठ अभियंते विजय कुडचडकर, कुडचडे विभागाचे साहाय्यक अभियंते देविदास गावडे व कनिष्ठ अभियंते वृषाली नाईक यांनी येथे भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली.
जोपर्यंत संबंधित चोरटय़ांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा करू दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका शिवडेवासियांनी घेतल्यानंतर चोरी प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्याचे आश्वासन श्री. गावडे यांनी दिले. सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी संबंधित चोरटय़ांना नोटीस पाठविण्याचे व येत्या तीन दिवसात जेसीबीद्वारे जलवाहिनी खोदून आणखी चोरटय़ा जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत का? याची शहानिशा करण्याचेही आश्वासन यावेळी ग्रामस्थांना देण्यात आले.
एक महिन्यापूर्वी शिवडे ग्रामस्थांनी पाणी प्रकल्पातून आडमार्गाने पाणी चोरले जात असल्याची तक्रार कुडचडे पाणी विभागाच्या कार्यालयात दिली होती मात्र संबंधित अधिकारी योग्य दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर 12 मे रोजी पाणी पुरवठा करण्यास हरकत घेतली होती. जोपर्यंत संबंधित अधिकारी प्रकल्पाजवळ येत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा करू न देण्याची कडक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यानंतर अधिकाऱयांनी प्रकल्पाजवळ भेट दिली असता चोरटय़ामार्गाने जलवाहिन्या जोडून पाणी चोरले जात असल्याचा प्रकार स्थानिकांनीच उजेडात आणला होता.
यावेळी अधिकाऱयांनी जोडण्या तोडण्याचे काम दुसऱया दिवसापासून सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे जोडण्या तोडण्यात आल्या होत्या मात्र संबंधित चोरटय़ांवर कसलीच कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शुक्रवारी पुन्हा ग्रामस्थांनी पाणी पुरवठा करण्यास विरोध केला.
यानंतर पाणी विभागाच्या अधिकाऱयांनी स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ग्रामस्थांकडून अधिकाऱयांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. जोपर्यंत चौकशी होऊन चोरटय़ांवर योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा करू दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यावेळी धारबांदोडा पंचायतीचे उपसरपंच परेश खुटकर व पंचसदस्य विनायक गांवस उपस्थित होते.
पाणी चोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे मात्र कनिष्ठ अभियंत्याकडून तसा अहवाल आपल्याला आला पाहिजे. संध्याकाळपर्यंत संबंधित चोरटय़ांना नोटीस पाठविली जावी, असा आदेश आपण साहाय्यक अभियंते देविदास गावडे यांना दिल्याचे मुख्य अभियंते विजय कुडचडकर यांनी सांगितले. पंचसदस्य विनायक गांवस व उपसरपंच परेश खुटकर यांनी घडलेला प्रकार योग्य नसून योग्य ती चौकशी करून शिवडेवासियांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे