प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेस्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. येथील व्यापारी गाळय़ांचे काम पूर्ण झाले असून बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येथील रस्ता करण्यासाठी खडी पसरून रोलर फिरविण्याचे काम सुरू आहे. बसस्थानकातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रेल्वेस्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून स्मार्ट बसथांबा निर्माण करण्यात येत आहे. एकाचवेळी दहा बस थांबण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच बसस्थानकाच्या सभोवती दहा व्यापारी गाळय़ांची उभारणी करण्यात आली असून हे काम पूर्ण झाले आहे. तसेच बसस्थानकाच्या उभारणीचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणी फौंडेशनचे काम पूर्ण करून पिलर उभारण्यात आले असून शेडचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसेच बसशेडच्या दुतर्फा आणखी व्यापारी गाळे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सोळा व्यापारी गाळे बांधण्यात आले आहेत. बसथांब्याच्या आवारात तिकीट काऊंटर व परिवहन मंडळाचे कार्यालय आणि पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले बसस्थानकाचे काम मार्गी लागल्याने प्रवाशांना निवारा मिळणार आहे. बसथांबा आवारातील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने खडीकरण करण्यात आले आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बसस्थानक नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे.शहराच्या दक्षिण भागातील बस या ठिकाणी थांबतात. तसेच खानापूर, रामनगर, कारवार, लोंढा, पणजी, गोवा, म्हापसा, दांडेली अशा विविध गावांना जाणाऱया बसदेखील या ठिकाणी थांबतात. त्यामुळे शेकडो नागरिक ये-जा करीत असतात. पण या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली होती. नागरिकांसाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच बसशेडदेखील नव्हते. त्यामुळे ऊन-पावसातच प्रवाशांना बसची प्रतीक्षा करत थांबावे लागत होते. त्यामुळे या बसस्थानकाचा विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.