तीन लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त
प्रतिनिधी / कारवार
काजूबाग-कारवार येथील चोरीप्रकरणी तीन चोरटय़ांना ताब्यात घेऊन चोरलेला सुमारे तीन लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात कारवार शहर पोलिसांना यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या ऐवजात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे.
रोहित आनंद हरिजन (वय 19 रा. अर्जुन टॉकीजवळ, काजूबाग-कारवार), असफाक उस्मान कटवाडी (वय 19 रा. दुर्गादेवी देवस्थानजवळ, कोडीबाग-कारवार) आणि अस्लम शेख नुरअलमशेख (वय 32 मूळचा पश्चिम बंगाल आणि सध्या आयटीआयजवळ बाड कारवार) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणाबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मूळचे कारवार तालुक्यातील सिद्धर येथील सुशांत उमेश शेठ, काजूबाग-कारवार येथील अर्जुन टॉकीजच्या पाठीमागे भाडोत्री घराला कुलूप लाऊन सिद्धर या आपल्या मूळगावी गेले होते. 13 एप्रिल रोजी जेव्हा ते घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरटय़ांनी लांबविल्याचे लक्षात आले. कारवार शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत त्यांनी 80 ग्रॅमचे विविध सोन्याचे दागिने, 38 ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबविल्याचे म्हटले
होते.
कारवार जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रकाश देवराजू, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एस. बद्रीनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली कारवार शहर पोलिसांनी चोरी प्रकरणाची कसून चौकशी केली आणि अवघ्या दोन दिवसात तीन चोरांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याकडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने, 86 ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम तीन हजारसह एकूण 3 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. कारवार शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.