पेट्रोल-डिझेल कारचे उत्पादन वाढविण्यासाठी वाहन कंपन्या करणार 21,000 कोटी खर्च
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक कार ही भविष्यात मुख्य वाहतूक व्यवस्थेत आगामी काळात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, पण पेट्रोल-डिझेल कारची मागणी कमी झालेली नाही. प्रमुख देशांतर्गत कंपन्या पारंपरिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी 21,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, किया मोटर्स, ह्युंदाई, टोयोटा यासारख्या कंपन्या पेट्रोल-डिझेल कारची उत्पादन क्षमता वाढवण्यात व्यस्त आहेत.
अशा कारची मागणी इतकी आहे की त्यांच्यासाठी जवळपास 20-22 महिन्यांची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागत आहे. 8 लाखांहून अधिक कारची डिलिव्हरी शिल्लक आहे. त्यात 99 टक्के पेट्रोल-डिझेल इंधनावर चालणाऱया कार्स आहेत. म्हणूनच मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या मुख्य वित्तीय अधिकाऱयांच्या मते, या कंपन्या पेट्रोल-डिझेल कारची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च करतील.
एसयूव्हीच्या मागणीत सातत्याने वाढ
महिंद्रा अँड महिंद्राः पुढील दीड वर्षात एसयूव्ही उत्पादन क्षमता वार्षिक 6 लाखांपर्यंत वाढवणार आहे. सध्या कंपनी दरवर्षी 3-3.5 लाख एसयूव्ही तयार करते. उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी 3 वर्षात 8,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
टाटा मोटर्सः उत्पादन क्षमता वार्षिक 6 लाखांवरून 9 लाखांपर्यंत वाढेल. साणंद प्रकल्प सुरू झाल्यानंतर मासिक उत्पादन क्षमता 25-30 हजारांनी वाढणार आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनी 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
मारुती सुझुकीः देशातील सर्वात मोठय़ा कार कंपनीने हरियाणामध्ये नवीन प्लांट बांधण्यासह इतर क्षमता विस्तार योजना देखील तयार केल्या आहेत. यासाठी 7 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कंपनी पेट्रोल-डिझेल व्हेरियंटमध्ये नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे.
नवीन कार विक्रीमध्ये ईव्हीचा वाटा 1 टक्कादेखील नाही
एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान देशात 18,142 ईव्हीची विक्री झाली. दुसरीकडे, या कालावधीत 19,36,740 कार विकल्या गेल्या.
दुसरीकडे इव्हीएस अमेरिकन बाजारपेठेत मुख्य प्रवाहात
अमेरिकेत ईव्ही मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. पेट्रोल-डिझेल महाग झाल्यानंतर लोक मोठय़ा प्रमाणावर ईव्हीचा अवलंब करत आहेत. जानेवारी-सप्टेंबर दरम्यान ईव्ही विक्री 70 टक्क्यांनी वाढली. नवीन कार विक्रीतील ईव्हीचा वाटाही एका वर्षात दुप्पट झाला आहे.