पोलीस तपासात निष्पन्न, विकत घेणाराचा शोध सुरू
प्रतिनिधी / कराड
कोपर्डे हवेली येथे बेकायदा पिस्टल व गावठी कट्टा विकायला आलेल्या संशयितास कराड ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून पकडले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर सध्या कारागृहात असलेल्या एका संशयिताकडून त्याने पिस्टल व गावटी कट्टा घेतला असल्याचे समोर येत आहे. ज्याच्याकडून पिस्टल व गावठी कट्टा घेतला आहे तो प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटकेत आहे. अटकेपूर्वीच त्याने पिस्टल दिल्याची शक्यता वर्तवली जात असून त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान पिस्टल, गावठी कट्टा कोण विकत घेणार होते याचाही पोलीस शोध घेत आहेत. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसरात एक संशयित मंगळवारी पिस्टलसह गावटी कट्टा, जिवंत काडतुसे विकायला आला होता. कराड-मसूर रोडवर कोपर्डे हवेलीतील रेल्वे फाटकाजवळ संशयित येणार असल्याची खात्री झालल्यावर पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी त्याला पकडले. संशयित पप्पू मोरे याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशीत त्याने हे पिस्टल, गावठी कट्टा कारागृहात असलेल्या अन्य एका संशयिताकडून घेतल्याचे समोर येत आहे. ज्याच्याकडून पिस्टल, गावठी कट्टा घेतला तो एका हल्लाप्रकरणी अटकेत असून तो कारागृहात आहे. मात्र पोलिसांनी या माहितीची खात्री करण्यासाठी वेगाने तपास सुरू केला आहे.