प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी एसीबीच्या अधिकाऱयांनी तपासणी केली. या तपासणीत नेमके काय आढळले, याचा तपशील अधिकाऱयांनी उघड केला नसला तरी जुन्या प्रकरणासंबंधी पंचनाम्यासाठी ही तपासणी झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
कारागृहापासून जवळच कृष्णकुमार यांचा सरकारी बंगला आहे. या बंगल्यात बुधवारी सकाळी एसीबीचे अधिकारी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप, सुनीलकुमार आदी अधिकाऱयांचा या पथकात समावेश होता.
उपलब्ध माहितीनुसार बेळगावला येण्यापूर्वी कृष्णकुमार हे बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहाचे अधीक्षक होते. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला या कारागृहात होत्या. त्यावेळी शशिकला यांची बडदास्त ठेवल्याचा आरोप झाला होता. आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी यासंबंधी सरकारला अहवाल पाठविला होता. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कृष्णकुमार यांच्या निवासस्थानी तपासणी झाली आहे. यासंबंधी एसीबीच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता बुधवारची कारवाई ही छापा नसून जुन्या प्रकरणाच्या तपासासाठी केलेली तपासणी आहे, असे त्यांनी सांगितले. यासंबंधी ‘तरुण भारत’ने कृष्णकुमार यांच्याशी संपर्क साधला असता एसीबीच्या अधिकाऱयांनी आपल्या निवासस्थानी तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले.