44 मतांची आघाडी. जिल्हा पंचायत सदस्याचा उमेदवार पराभूत
प्रतिनिधी / डिचोली
मये मतदारसंघतील कारापूर सर्वण यां पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अजास खान यांनी विजय पटकावला. त्यांनी 46 मतांच्या फरकाने माजी पंचसदस्य तसेच विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार राजेश नाईक यांचा पराभव केला.
या प्रभागाचे माजी पंचसदस्य महेश सावंत यांची जिल्हा पंचायत सदस्यपदी निवड झाल्यानंतर या प्रभागाच्या रिक्त असलेल्या पदासाठी हि पोटनिवडणुकीत घेण्यात आली होती. एकूण 5 उमेदवार या निवडणुकीत रिंगणात उतरले होते. त्यात अजास खान यांनी बाजी मारली. त्यांना 190 मते पडली. तर विरोधी उमेदवार राजेश नाईक यांना 144, भालचंद्र बापे यां?ना 143, सिध्देश तारी यांना 41 व प्रेमानंद सावंत यांना 13 मते पडली.
पराभूत झालेले दोन्ही उमेदवार हे भाजपचेच होते. भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत यांनी राजेश नाईक यांना पाठिंबा दिला होता. तर भालचंद्र बापे हे मये मतदारसंघातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या प्रभागात भाजपच्याच मतांमध्ये फुट पडणार असा अंदाज होता. निकालातील आकडेवारी पाहता तोच अंदाज खरा ठरल्याचे दिसून येते. तर विजयी उमेदवार अजास खान यांना अंतर्गतपणे मगो पक्षाचा पाठिंबा लाभल्याची माहिती मिळाली आहे.
रियाझ खान यांनी दुसराही गड रखला
या प्रभागात निवडून आलेले अजास खान हे माजी साखळीचे नगरसेवक रियाझ खान यांचे भाऊ असून त्यांनीच त्यांना खंबीर पाठिंबा देत निवडणूक रिंगणात उतरविले होते. आणि आपल्या क्षमतेप्रमाणे काम करीत त्यांनी ही जागा पटकावली. काहीच दिवसांपूर्वी साखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 9 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रियाझ खान यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मेश सगलानी यांनी उतरविलेला उमेदवार राजेंद्र आमेशकर यांना निवडून आणले होते. या प्रभागात साखळी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. स्वतः स्थानिक आमदार या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुध्दा या प्रभागातील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात भाग घेतला होता. तरीही काहीच फायदा झाला नव्हता. आणि सगलानी गटाचा उमेदवार 19 मतांच्या आघाडीने निवडून आला होता. यावेळेस कारापूर सर्वण पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मध्येही रियाझ यांनी उतरविलेला उमेदवार निवडून आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. आणि त्यात ते यशस्वी ठरले. त्यांनी साखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 9 नंतर कारापूर सर्वण पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 चा गड राखला.
जि. पंचायत सदस्य महेश सावंत ठरले निष्प्रभ ?
या पंचायतीच्या प्रभाग क्र 2 मध्ये माजी पंचसदस्य तथा जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत यांचे चांगलेच वर्चस्व होते. ते सहा वेळा पंचसदस्य म्हणून निवडून आल्याने त्यांनी रिंगणात उतरविलेल्या राजेश नाईक यांना त्यांचा लाभ होणार असे दिसून येत होते. मात्र या निकालानंतर या प्रभागात जि. पंचायत सदस्य महेश सावंत हे निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे. तसेच या प्रभागात रिंगणात उतरलेले भालचंद्र बापे यांना स्थानिकांनी पाठिंबा देत रिंगणात उतरविले होते. त्यांचाही प्रभाव जास्त चालला नाही.