प्रतिनिधी / शिराळा
शिराळा येथील नाथ मंदिरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज वारकऱ्यांनी नाथांचे दर्शन घेतले. तब्बल आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे. त्यामुळे वारीत पडलेला खंड आज पुन्हा एकदा सुरू झाला. त्यामुळे भक्तांच्यारांगा नाथ मंदिराकडे लागल्या. येथील विठ्ठल मंदिरात एकादशी दिवशी पंढरीचा पांडुरंग येत असतो, अशी धारणा लोकांमध्ये आहे.
पंढरपूर प्रमाणेच नाथांचीवारी करणारे वारकरी आहेत.दर पंधरा दिवसांनी गोरक्ष नाथांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भक्त येत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे मंदिर गेली आठ महिने बंद होते. आठ महिन्यानंतर दिवाळी पाडव्यादिवशी मंदिरे दर्शनासाठी खुली झाली. त्यानंतर आलेली ही पहिलीच एकादशी आहे. विशेष म्हणजे कार्तिकी एकादशी असल्याने वारकऱ्यांनी नाथ मंदिरात दर्शनासाठी उपस्थिती दाखवली . मास्क असल्या शिवाय मंदीरात प्रवेश दिला जात नाही.
अगरबत्ती,नारळ विकणारे,गंध लावून उपजिविका करणारे, फरसाना,चिरमुरे विकणारे छोटे विक्रेते यांना आज थोडीफार कमाई झाली आहे.
दर एकादशीला रात्री तिथं भजनाची परंपरा देखील आहे. परिसरातील भजनी मंडळ रोटेशन पद्धतीने भजन करतात. शिवाय दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे देखील नियोजन असते . लॉकडडाऊन काळात भाविकांनी रस्त्यावरूनच दर्शन घेणे पसंत केले होते. आता मंदीर खुले झाल्याने वारी पुन्हा सुरू झाल्याची भावना भक्तांमध्ये दिसून येत आहे.