भाजपाध्यक्ष तानावडे यांनी दिला होता आदेश : कुंभारजुवे झेडपी सिद्धेश नाईक होणार नवे अध्यक्ष
प्रतिनिधी /पणजी
एका अनपेक्षित राजकीय घडामोडीत उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर या भाजपनेच निवडलेल्या नेत्याला भाजपने काल सोमवारी राजीनामा देण्यास भाग पाडले. कुंभारजुवेचे जिल्हा पंचायत सदस्य व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक हे उत्तर गोवा जि. पं. चे अध्यक्ष असतील.
कार्तिक कुडणेकर हे गेल्यावर्षी झालेल्या जि. पं. निवडणुकीत बार्देशमधून विजयी झाले होते. सर्वसामान्य कार्यकर्ता, बैलगाडी चालकापासून ते पंच, सरपंच व जि. पं. सदस्य आणि जि. पं. अध्यक्ष असा त्यांचा हा राजकीय प्रवास होता. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचार कार्यात भाजपची जोरदार बाजू मांडली नसल्याने भाजपच्याच काही नेत्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. पक्षाने निवडणुकीच्या दरम्यान त्यांना कोणतेही आदेश दिले नाहीत मात्र निवडणूक निकालानंतर व भाजपचे सरकार निश्चित झाल्यानंतर कार्तिक कुडणेकर यांना भाजपने दूर केले आहे.
काल सोमवारी सकाळी प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कार्तिक कुडणेकर यांना कार्यालयात बोलावून घेतले आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा आदेश दिला. त्यानंतर कुडणेकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.
सिद्धेश नाईक होणार नवे अध्यक्ष
भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक यांची उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी निवड करण्याचे ठरविले आहे. त्या दिशेने पक्षाने हालचाली सुरु केल्या आहेत.
असा कोणता गुन्हा केला मी? : कार्तिक
कार्तिक कुडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपल्याला राजीनामा देण्यास का भाग पाडले? हे मला माहीत नाही. परंतु, आताच राजीनामा दे असा आदेश दिल्यानंतर आपण कोणतेही कारण विचारले नाही. तडकाफडकी राजीनामा दिला. आपल्याला पक्षानेच आजवर इथपर्यंत चांगल्या पदापर्यंत नेले. आपण गरीब कुटुंबातील, राजकारणात पैसे कमविण्यासाठी आलो नाही. अत्यंत प्रामाणिकपणे भाजपची सेवा बजावली. जे सांगतील ते काम केले.
निष्ठावंताना हटविण्यासाठी फिल्डिंग
कुडणेकर पुढे म्हणाले की, मला देखील स्वाभिमान आहे. पक्षामध्ये इतर पक्षातून आलेली मंडळी पक्षातील निष्ठावंताना हटविण्यासाठी फिल्डिंग लावतात, त्याचाच हा एक भाग आहे. मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. राजीनामा देऊन आपण घरी पोहोचलो त्यावेळी सुमारे 75 भाजप कार्यकर्ते मला भेटण्यास आले. त्यांना पाहून मला रडूच आले. कोणताही गुन्हा नसताना आपल्याला ही सजा देण्यात आली. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून आपण दुपारचे जेवण घेतले, अन्यथा इच्छा होईना. पद गेल्याचे मुळीच दुःख नाही. दुःख एवढय़ाच गोष्टीचे भाजपच्या निष्ठावंताना डावलून लावले जातेय.
कुडणेकर दिल्लीला रवाना
सायंकाळी अगोदर ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या निमंत्रणावरुन कार्तिक कुडणेकर व इतर दोन जि. पं. सदस्य उत्तर गोवा तसेच दक्षिण गोव्यातील तीन जि. पं. सदस्य तसेच काही पंच, सरपंच हे दिल्लीला रवाना झाले आहेत. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात ते सहभागी होऊन दोन दिवसांत गोव्यात परतणार आहेत.