बेळगाव / प्रतिनिधी
कार्तिक उत्सवानिमित्त शहर परिसरातील विविध मंदिरात पूजा-अर्चा करण्यात आली. जागृत पुरातन काळातील भोई गल्लीतील श्री कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक उत्सवानिमित्त सकाळी प्रवीण महेंद्रकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी कार्तिक स्वामींची फुलांनी आकर्षक आरास करून पूजा करण्यात आली. यावेळी मंदिरात कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर समितीच्या सदस्यांनी कायद्याचे पालन करून प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन प्रवेश दिला जात होता.
भोई गल्ली येथील कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार 2005 साली झाला. त्यानंतर कळसारोहण 2019 मध्ये करण्यात आले. उत्तर कर्नाटकातील एकमेव पाषाणातील मूर्ती जिथे फक्त कार्तिक स्वामींची पूजा होते, असे हे मंदिर आहे. त्यामुळे दरवषी कार्तिक उत्सवानिमित्त मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मंदिरातील महाप्रसाद रद्द करण्यात आला होता.