प्रतिनिधी / कोल्हापूर
अंबाबाई मंदिराजवळील संत गाडगे महाराज पुतळ्Îानजिकच्या कार्तिक स्वामी मंदिरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकती खबरदारी घेत कार्तिक स्वामी जयंती साजरा करण्यात आली. जयंतीदिनी कार्तिक स्वामीचे प्रत्यक्ष त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे हे मोठे भाग्याचे समजले जाते. पण कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना मंदिरात न सोडता स्वामींचे फक्त मुखदर्शन घेता येईल, अशी व्यवस्था केली. असे असले तरीही दिवसभरात स्थानिकांसह परगावातील हजारो भाविकांनी श्रद्धेपोटी मंदिराबाहेरून मुखदर्शन घेत कार्तिक स्वामी की जय हो असा गजर केला.
यंदाचा कार्तिक स्वामी जयंती सोहळा हा त्रिपुरारी पौर्णिमेच्या योगावर साजरा झाला. दुपारी 12 वाजून 47 मिनिट ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत असा जयंतीचा कालावधी होता.
अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळून मुखदर्शन रांगेची व्यवस्था केली होती. जयंतीच्या सुरूवातीचा काळ पकडून शेकडो भाविकांनी रांगेतून मंदिराकडे जाऊन स्वामींचे मुखदर्शन घेतले. दुपारी अडीच नंतर मात्र भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने येऊ लागले. त्यामुळे गर्दीचा माहोल तयार झाला. इतकेच नव्हे तर दर्शन रांग मंदिरापासून महाद्वार रोडपर्यंत पोहोचली. अशा लांबलचक रांगेने हजारो भाविकांनी रात्री 10 वाजेपर्यंत कार्तिक स्वामींचे मुखदर्शन घेतले.