चेन्नई : चॅम्पियन्स चेस टूरचा एक टप्पा असलेल्या स्किलिंग ओपन बुद्धिबळ स्पर्धेत एकाच दिवशी आठ ग्रँडमास्टर्स स्पर्धेतून बाहेर पडले असून वर्ल्ड चॅम्पियन नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन व अमेरिकेचा हिकारु नाकामुरा यांनी बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे. राऊंडरॉबिन टप्प्यानंतर दोघांनी संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले.
कार्लसन, नाकामुरा व अन्य सहा जणांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र चीनचा नंबर वन खेळाडू डिंग लिरेन, किशोरवयीन खेळाडू अलिरेझा फिरोजा यांचे आव्हान संपुष्टात आले. नेदरलँड्सचा अव्वल खेळाडू अनिश गिरी थोडक्यात बचावल्याने शेवटच्या आठमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने डिंगचा पराभव करून बाद फेरी गाठली. फ्रान्सचा मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्हनेही बाद फेरी गाठली असून व्हिएतनामच्या क्वांग लिएम लीची संधी मात्र थोडक्यात हुकली. अर्मेनियाच्या लेव्हॉन ऍरोनियनने 14 व्या फेरीत सर्जी कर्जाकिनला पराभवाचा अनपेक्षित धक्का देत बाद फेरीत स्थान मिळविले.
दिवसातील पहिल्या लढतीत कार्लसन नाकामुराकडून पराभवाच्या मार्गावर होता. त्याने केलेल्या चुकीमुळे नाकामुराला आक्रमण करण्याची संधी मिळाली होती. पण कार्लसनने नंतर अप्रतिम बचाव करीत डाव अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. दोघांनी समान गुण मिळवित संयुक्त आघाडी घेतली असून चार खेळाडूंनी 8, तीन खेळाडूंनी 7.5 व दोघांनी 7 गुण मिळविले आहेत. अँटोन, कर्जाकिन, जॅन क्रीस्तॉफ डुडा, विदित गुजराथी, पीटर स्विडलर यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत कार्लसन-गिरी, नेपोमनियाची-ऍरोनियन, वेस्ली सो-रॅडेबोव्ह, नाकामुरा-एमव्हीएल अशा लढती होणार आहेत.