जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा
दुबई / वृत्तसंस्था
विद्यमान जगज्जेता कार्लसन व त्याचा रशियन चॅलेंजर नेपोम्नियाची यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील सलग तिसरी फेरी देखील बरोबरीत राहिली. 14 फेऱयांच्या या लढतीत आव्हानवीर नेपोम्नियाची याची पटावरील स्थिती अधिक सरस होती आणि यामुळे खरे दडपण कार्लसनवरच राहिले होते. पहिल्या तीन फेऱयांअखेर दोन्ही ग्रँडमास्टर्सच्या खात्यावर प्रत्येकी दीड गुण झाले आहेत.
रविवारी या स्पर्धेतील तिसऱया फेरीतील लढत 41 चालीअखेर बरोबरीत राहिली. ही फेरी बरोबरीत राहिली असली तरी उभयतात पटावरील संघर्ष मात्र अटीतटीचा झाला.
या जागतिक स्पर्धेंतर्गत एकूण 14 फेऱया खेळवल्या जाणार असून यात उभयतात बरोबरी कायम राहिल्यास दि. 16 डिसेंबर रोजी टायब्रेकरचा अवलंब केला जाणार आहे. टायब्रेकमध्ये बेस्ट ऑफ 4 रॅपिड राऊंड होत असून प्रत्येक चालीनंतर उभयतांना 10 सेकंदांची इनक्रिमेंट मिळेल. टायब्रेकरही बरोबरीत राहिल्यास 5 मिनी मॅचेसचे 2 ब्लित्झ गेम्स खेळवले जातील. त्यातही कोंडी कायम राहिली तर आर्मगेडॉन या सडनडेथ प्रकाराचा अवलंब केला जाईल आणि त्यातून नवा विजेता निश्चित होईल, अशी या स्पर्धेची रचना आहे.
कार्लसनने दुसऱयांदा व तिसऱयांदा जेतेपद कायम राखले त्यावेळी जागतिक अजिंक्यपद लढती टायब्रेकरपर्यंत पोहोचल्या. यंदाही तीच परंपरा कायम राहणार का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.