स्मार्टफोन निर्मितीवरही परिणाम – तैवानमधील कंपन्यांकडून निर्मिती सुरू
वृत्तसंस्था/ बेंगळूर
चीनमध्ये कोरोनामुळे निर्मिती कारखान्यांतील उत्पादन प्रभावीत झाले असून सध्याला ऑटो क्षेत्रासह इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांना चिप व सेमीकंडक्टरच्या तुटवडय़ाचा परिणाम झेलावा लागतो आहे. सदरची चिपची टंचाई ही 2022 मध्ये संपुष्टात येणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात याआधीही मोटारींच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे सुतोवाच अनेक कंपन्यांनी केले होते. त्याप्रमाणे उत्पादनावर परिणाम होत आहे. दरम्यान एप्रिल, मे दरम्यान देशभरात लॉकडाऊनमुळे कार्सच्या मागणीवर काहीसा परिणाम दिसून आला होता. त्यामुळे बाजारात मागणी वाढीव नव्हती. चिप व सेमीकंडक्टरच्या अभावामुळे कार उत्पादनात जागतिक स्तरावर अडथळे जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनाही चिप टंचाईचा सामना करावा लागत असून त्यांच्या उत्पादनावर परिणाम होताना दिसतो आहे. यातही ऑटोमोटीव्ह क्षेत्राला यंदा सर्वाधिक फटका बसला आहे. चिप, सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ात लवकरच सुधारणा अपेक्षीत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ऑटो क्षेत्रातील निर्मात्या कंपन्यांना यंदा चिपचा नियमित पुरवठा होऊ न शकल्याने उत्पादनावर परिणाम जाणवला आहे.
या आहेत कंपन्या तैवानमधील सेमीकंडक्टर कंपन्या आता चिप निर्मितीवर पुन्हा भर देतील, असे सांगितले जात आहे. जगातील सर्वाधिक सेमीकंडक्टरचा पुरवठा करणाऱया एएसएमएल कंपनीच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रात टीएसएमसी आणि इंटेल या कंपन्यादेखील चिप निर्मितीच्या शर्यतीत दिसत आहेत.