प्रतिनिधी/ बेळगाव
बापट गल्ली येथील कालिकादेवीचा वर्धापनदिन माघ वद्य अष्टमी या तिथीनुसार कालिका मंदिरात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भक्ती सांस्कृतिक भजनी मंडळाच्यावतीने सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर कालिकादेवीचे पूजन करण्यात आले. मूर्तीला अभिषेक घालून गल्लीतील महिलांच्या हस्ते देवीला वस्त्रे चढवून ओटी भरण्यात आली. युवा समितीचे उपाध्यक्ष अंकुश केसरकर व गो-रक्षक नरू निलजकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मोहन ओक यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गल्लीतील पंच मंडळी, मंडळाचे पदाधिकारी, महिला, युवावर्ग उपस्थित होते.