शिलाँग
ईशान्य भारतात वैज्ञानिकांच्या एका पथकाने बांबूच्या जंगलात मशरुमची एक विशेष प्रजाती शोधून काढली आहे. मेघालयात आढळलेली ही मशरुमची प्रजाती रात्रीच्या काळोखात हिरव्या रंगात प्रकाशमान होते. या मशरुम्सना बायोल्यूमिनिसेंट म्हटले जाते. अशाप्रकारचे मशरुम रोरिडोमायसिस जीनसचे सदस्य असून ही एक नवी प्रजाती असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. हे संशोधन बॉटनी जर्नल फायटोटेक्सामध्ये प्रकाशित झाले आहे. सर्वसाधारणपणे बायोल्यूमिनिसेंट समुद्रात तयार होतात, परंतु जमिनीवर उगवत असल्याचेही आता आढळून आले आहे. या मशरुमधून बाहेर पडणारा प्रकाश हा त्यातील रासायनिक घटकांमुळे निर्माण होत असतो. अशाप्रकारचे मशरुम खाण्यास योग्य नसल्याचे मेघालयातील लोकांना माहित आहे. लोक त्याचा वापर काळोखात टॉर्चप्रमाणे करतात.