तिसरे जेएमएफसी न्यायालयाने दिला जामीन
प्रतिनिधी /बेळगाव
1 नोव्हेंबर 2016 रोजी म. ए. समितीच्यावतीने मूक सायकलफेरी काढण्यात येत होती. या मूकफेरी दरम्यान काकेरी चौकात आल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी लाल-पिवळय़ा रंगाचा झेंडा काढून फाडला. याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात म. ए. समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तिसरे जेएमएफसी न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला आहे.
काकेरी चौक येथे मूकफेरी आल्यानंतर म. ए. समितीचे शन्मुख चोपडे, राहुल कुरणे, श्रीनिवास पोळ यांसह इतर कार्यकर्त्यांनी तेथील लाल-पिवळा ध्वज काढून फाडला. त्यानंतर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
याप्रकरणी कन्नड व मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्यास जबाबदार धरून म. ए. समितीच्या दीपक दळवी, मालोजी अष्टेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयात याप्रकरणी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन 10 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार, प्रत्येक तारखेला हजर राहणे, साक्षीदारांना धमकावू नये, या अटींवर जामीन मंजूर केला आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. शंकर पाटील, ऍड. वर्षा जवळकर यांनी काम पाहिले.