पुणे / वार्ताहर :
नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलन करणाऱया संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘छिन के लेंगे आझादी’ यासारख्या घोषणा दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी डेक्कन पोलिसांकडे दाखल केली आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाबाहेर शनिवारी व रविवारी सायंकाळी काही संघटनांनी सीएए व एनआरसीविरुद्ध रात्रभर आंदोलन केले होते. रविवारी मध्यरात्री एक वाजता संबंधित ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस कर्मचाऱयांच्या उपस्थितीत घोषणाबाजी सुरू होती. मात्र, तेथे आंदोलन करणाऱया संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘छिन के लेंगे आझादी’ अशा घोषणा दिल्या. हुल्लडबाजी केली जात होती, त्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करावी, असे गौरव बापट यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले. याबाबत डेक्कन पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नसून, तक्रार अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.