प्रतिनिधी / वारणानगर
काश्मिरी पंडीतांची पंधरा दिवसापूर्वी हत्या करून लपलेल्या दोन अतिरेक्यांना दि. १३ जून रोजी ५ वा. अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत कंठस्थान घालण्यात यशस्वी झालेल्या मोहरे ता. पन्हाळा येथील महेश शशीकांत जगदाळे या भारतीय सेनेतील जवानाचे वारणा परिसरासह सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.
भारतीय सैन्य दलात राष्ट्रीय रायफल मध्ये १९ क्रमांकाच्या युनिटमध्ये महेश जगदाळे हा सन २०१४ पासून कार्यरत आहे. नाशिक येथील प्रशिक्षण कार्यकाल संपल्यानंतर महेशने कारगिल येथील सेवा पूर्ण केल्यावर तो सद्या अनंतनाग येथे कार्यरत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण तसेच विद्यालयीन शिक्षण मोहरे हायस्कूल मोहरे येथे झाले असून त्याचे वडील शशीकांत शेतकरी असून आजोबा भिमराव जगदाळे हे माजी सैनिक आहेत.
महेश जगदाळे याने दोन अतिरेक्यांना कंठस्थान घातलेबद्दल राष्ट्रीय रायफलचे युनिट हेड निरजंन कौर यांनी त्याचा विशेष सत्कार भेटवस्तू देवून केला आहे. महेशच्या या साहसी पराक्रमाबद्दल त्याचे वारणा परिसरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून कौतुक व अभिनंदन होत आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यानी महेशच्या कुटूंबाचे अभिनंदन केले आहे. अनंतनाग काश्मिर येथे दोन अतिरेक्यांना कंठस्थान घातलेल्या महेश जगदाळे यांचा भेटवस्तू देवून सत्कार करताना युनिट हेड निरजंन कौर व इतर सहकारी जवान हजर होते.