ऑनलाईन टीम / जम्मू :
दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल बस स्टँडवर शनिवारी दहशतवाद्यांनी बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात 8 नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्रालमधील बस स्टँडवर दहशतवाद्यांनी एस एस बी च्या जवानांवर बॉम्ब फेकला. सुदैवाने नेम चुकला आणि बॉम्ब रस्त्यावर फुटला.
मात्र, या घटनेत 8 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर या हल्ल्यानंतर लगेचच जवानांनी हे क्षेत्र घेरले असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी अभियान सुरू केले आहे.
जखमींची ओळख पटली असून जावेद अहमद ( रा. त्राल), वली मोहम्मद राथल (रा. पानेर), अब्दुल्ला (रा. हाकिम), ताबिश (रा. पस्तूना), शाजदा (रा. पस्तूना), ताजा (रा. अमिराबाद) , शहीना (रा. पौतूना) आणि बिलाल नाईक अशी नावे आहेत.